भारतापुढे चीनचं नवं आव्हान, सीमावर्ती भागात 'पीएलए' तैनात

भारतासमवेत आपल्या शेजारील देशांच्या अडचणींत भरच पडेल असे निर्णय वारंवार चीन सरकारकडून घेतले जात आहेत. 

Updated: Mar 22, 2018, 08:56 AM IST
भारतापुढे चीनचं नवं आव्हान, सीमावर्ती भागात 'पीएलए' तैनात title=

नवी दिल्ली : भारतासमवेत आपल्या शेजारील देशांच्या अडचणींत भरच पडेल असे निर्णय वारंवार चीन सरकारकडून घेतले जात आहेत. 

चीननं आपल्या बॉर्डर सुरक्षा नीतिमध्ये बदल केलेत. यापुढे चीनच्या सीमावर्ती भागाचं संपूर्ण नियंत्रण चीनच्या 'पीपल्स लिबरेशन आर्मी' (PLA) कडे राहील. यापूर्वी ही जबाबदारी सीमा पोलिसांकडे होती.

अर्थातच चीनच्या या निर्णयाचा परिणाम सरळसरळ भारतावरही होणार आहे. यापूर्वीही बॉर्डरवर भारत आणि चीनी सैनिकांत अनेकदा खटके उडालेले दिसले होते. अशा परिस्थितीत चीनचा हा निर्णय भारताच्या तणावात भरच घालू शकतो. 

गेल्या काही दिवसांत चीननं आपल्या अनेक नियमांत बदल केले आहेत. चीनच्या संसदेनं नुकतंच राष्ट्रपती पदासाठी कोणतीही मर्यादा संपुष्टात आणलीय. यामुळेच शी जिनपिंग आजीवन राष्ट्रपती म्हणून राहू शकतात. 

पीएलएचं संपूर्ण नियंत्रण चीन कम्युनिस्ट पार्टीच्या हातात आहे. गेल्या काही दिवसांत जे काही बदल करण्यात आलेत त्याचा परिणाम म्हणून देशाची सगळी ताकद कम्युनिस्ट पार्टीच्या हाती येताना दिसतेय. 

यापूर्वीही सीमावर्ती भागात पीएलए तैनात होती. परंतु, सीमा पोलीस मुख्य रुपात पोर्ट, सीमावर्ती भागातील मुख्य ठिकाणांवर तैनात होती. यापूर्वी सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाकडे सीमा पोलिसांची जबाबदारी होती. परंतु, यापुढे सीमा पोलीसही पीएलएला रिपोर्ट करतील. नव्या नियमांनुसार, पीएलएकडे सीमावर्ती भागाची संपूर्ण जबाबदारी मिळेल.