नवी दिल्ली : तपासणीसाठी कार थांबविण्याचा इशारा करणाऱ्या पोलिसाच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रकार समोर आला आहे.
नेहमी प्रमाणे फूटपाथ शेजारी लागलेल्या स्टॉलवरुन कुणी खरेदी करत होतं. कुणी रस्त्याच्या कडेला उभं राहून गप्पा मारत होतं. मात्र, त्याच दरम्यान एक भरधाव गाडी तेथून जाते आणि या कारच्या बोनेटवर लटकलेला होता पोलीस कर्मचारी. तर, एक पोलीस कर्मचारी गाडीचा धक्का लागल्याने खाली कोसळतो.
चक्क पोलीस कर्मचारीच कारच्या बोनेटवर लटकलेला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जवळपास दोन किलोमीटर अंतर पार केल्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याला वाचविण्यात आलं. तर, आरोपी कार चालकाला पोलिसांनी अटक केली. ही घटना चीनमधील डेलियन येथे घडल्याचं कळतयं.
मिळालेल्या माहितीनुसार, नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एका कार चालकाला कार थांबविण्यास सांगितलं. मात्र, त्याने न थांबता कारचा स्पीड वाढवला आणि पळून जाण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान, एका पोलिसाने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, कारचालकाने त्या पोलिसाला धडक दिली आणि पळ काढला. त्या पोलिसाने गाडीच्या बोनेटला घट्ट पकडून ठेवल्याने तो वाचला.
त्यानंतर आरोपी कारचालकाने कारवरुन पोलीस कर्मचाऱ्याला खाली पाडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, तो अयशस्वी झाला. जवळपास दोन किलोमीटर अंतर पार केल्यावर काहीं बाईकस्वारांनी ती कार रोखली आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याला बोनेटवरुन खाली उतरवले.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओही सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.