सगळं सोडून आता बटर चिकन वादात पाकिस्तानची उडी; आता म्हणे 'आमच्या इथे...'

Butter chicken controversy : तिथं देश आर्थिक संकटाशी दोन हात करत असतानाच इथं पाकिस्ताननं म्हणे भारतात सुरू असणाऱ्या बटर चिकन वादात उडी घेतली आहे.   

सायली पाटील | Updated: Sep 13, 2024, 09:40 AM IST
सगळं सोडून आता बटर चिकन वादात पाकिस्तानची उडी; आता म्हणे 'आमच्या इथे...' title=
(छाया सौजन्य- स्पाईसरुट्स)/ Butter chicken controversy peshawar moti mahal pakistan latest updates and details

Butter chicken controversy : खाण्याच्या एखाद्या पदार्थावरून सुरू असणारा वाद नेमका कुठवर जाऊ शकतो, हा प्रश्न पडला असेल तर याचं उत्तर आहे थेट पाकिस्तानपर्यंत. कारण, भारतात अतिशय आवडीनं खाल्ल्या जाणाऱ्या बटर चिकन या पदार्थावरून माजलेल्या वादंगामध्ये आता पाकिस्ताननंही उडी घेतली आहे. इथं पेशावरमधील काही जुन्या नागरिकांना त्यांच्या शहरात असणाऱ्या मोती महल रेस्तराँची आठवण तर आहे, पण या हॉटेलच्या मेन्यूमध्ये हा पदार्थ होता की नाही, हे मात्र त्यांच्या लक्षात नाहीय. 

गेल्या काही दिवसांपासून बटर चिकन हे नेमकं कोणाच्या मालकीचं अर्थात या पदार्थावर स्वामित्व हक्क कुणाचा यावरून बरीच मतमतांतरं झाली. इतकंच काय तर हा वाद थेट न्यायालयातही पोहोचला. कायदेशीर लढाईमध्ये गतकाळातील अनेक संदर्भही मांडण्यात आले. मोती महल आणि दरियागंज अशा दोन हॉटेलांनी या पदार्थावर स्वामित्व हक्क सांगितला असून, फाळणीनंतर दिल्लीमध्ये कुंदनलाल गुजराल आणि कुंदनलाल जग्गी यांनी हे हॉटेल सुरू केले होते. 

दरम्यान, पेशावरमधील जुने स्थायिक रहिवासी मुश्ताक खान यानी स्थानिक वृत्तवाहिनीशी संवाद साधताना हे हॉटेल त्या काळात चहा, कुरकुरीत भजी, पनीर अशा पदार्थांसाठी ओळखलं जात होतं. हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पदार्थांचे दर अधिक असल्यामुळं तिथं श्रीमंत आणि ब्रिटीशांचाच अधिक वावर होता. इथं या रेस्तराँचं स्वयंपाकघर तळमजल्याला होतं, जिथं आता एक कपड्यांचं दुकान आहे. मोती महल रेस्तराँच्या पहिल्या मजल्यावर एक पारंपरिक तंदूर होती तिथं तंदूरी चिकन आणि नान तयार केले जात होते. 

पेशावरमधील याच बाजारामध्ये दुकान असणाऱ्या एका ज्येष्ठ व्यावसायिकांच्या मते मोती महलच्या मेन्यूवर कधीच बटर चिकन नव्हतं. गुजराल यांनी दिल्लीत आल्यावरच या पदार्थाची सुरुवात केली होती. एकिक़डे गुजराल यांच्या वंशजांकडून हा पदार्थ पेशावरमध्येच सुरू केला गेल्याचा दावा करण्यात आला तर, दुसरीकडे जग्गी यांच्या नातवाच्या तर्कानुसार फाळणीनंतर त्यांनी दिल्लीमध्येच या पदार्थाची सुरुवात केली होती. इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे पाकिस्तानमधील पाककलेवर आधारित संदर्भच इथंही वापरण्यात आल्याचं आढळतं. 

हेसुद्धा वाचा : आधी कोंबडी की अंड? यापेक्षा मोठा झाला 'बटर चिकन'चा वाद, हायकोर्टात पोहोचलं प्रकरण? शोध कुणी लावला?

'जिओ न्यूज'नुसार 20 व्या शतकाच्या सुरुवातीलाच कँटोनमेंट क्षेत्रापासून या कथेचा प्रारंभ झाला, जिथं मोती महल रेस्टराँ टिपू सुल्तान रोडपाशी असणाऱ्या फव्वारा चौक येथील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर होतं. इथंही हॉटेलच्या सुरुवातीला अनुसरून दोन वेगळ्या कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार मोती महतली सुरुवात 1920 मध्ये करण्यात आली होती. या हॉटेलटचा मालकी हक्क शीख व्यावसायिक मोता सिंग लांबा यांच्याकडे होता, तर जग्गी यांनी इथं काम केलं होतं. सध्याच्या घडीला ही दोन्ही हॉटेलं दिल्लीमध्ये असून, इथं मालकी हक्क वंशजांच्या हाती आहेत. मागील कैक दिवसांपासून त्यांच्यामध्ये बटर चिकन या पदार्थावरून वादाची ठिणगी धुमसत असून, आता पाकिस्तानातून समोर आलेल्या माहितीमुळं या प्रकरणाला आणखी कोणतं वळण मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.