पाकिस्तानात मसूद अझरच्या भावासहीत ४४ दहशतवाद्यांना अटक

पाकिस्तानने कितीही नाही म्हटले तरी देशात दहशतवादी असल्याचे आता उघड झाले आहे.  

ANI | Updated: Mar 5, 2019, 10:09 PM IST
पाकिस्तानात मसूद अझरच्या भावासहीत ४४ दहशतवाद्यांना अटक title=
संग्रहित छाया

इस्लामाबाद : पाकिस्तानने कितीही नाही म्हटले तरी देशात दहशतवादी असल्याचे आता उघड झाले आहे. जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरचा भाऊ मुफ्ती अब्दुर रौफसह बंदी असलेल्या या संघटनेच्या ४४ दहशतवाद्यांना पाकिस्तानने अटक केल्याचे वृत्त हाती आले आहे. जगातून वाढदिलेल्या दबावानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात पाऊल उचलले आहे. पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादाला प्रोत्साहन मिळता कामा नये आणि दहशतवाद्यांविरोधात सरकारने कारवाई करावी असा जगभरातून दबाव वाढत आहे. पाकिस्तानमधील बालाकोट येथे भारताने दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. त्यानंतर अमेरिका, सौदी अरेबिया या देशांकडून पाकिस्तानवर दबाब वाढला आहे.

पाकिस्तानने जैश संघटनेच्या ४४ जणांना अटक केली आहे, अशी माहिती पाकिस्तानचे मंत्री शहरयार खान अफ्रिदी यांनी पत्रकारपरिषद घेऊन दिली. मसूद अझरचा भाऊ मुफ्ती अब्दुर रौफ आणि हमाद अझर यांच्या ४४ जणांमध्ये समावेश आहे. भारताने पाकिस्तानला गेल्या आठवड्यात दिलेल्या अहवालामध्येही रौफ आणि अझरच्या नावांचा उल्लेख होता, असे ते म्हणाले. दरम्यान, आम्ही कोणाच्या दबावाखाली ही कारवाई करण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी केला.

बंदी घातलेल्या सगळ्या संघटनांविरोधात पाकिस्तान कारवाई करेल, असे अफ्रिदी यांनी सांगितले. देशामध्ये बंदी असलेल्या संघटनांवर कारवाई संदर्भात संयुक्त राष्ट्रांचे काही निकष आहेत. या संदर्भातील कारवाईचे सुनियोजन करता यावे यासाठी पाकिस्तानच्या संसदेने सोमवारी एक कायदा मंजूर केला. त्यानुसार ही अटक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, नवीन कायद्यामुळे आता बंदी घातलेल्या संघटनांची मालमत्ता आणि संपत्ती सरकारला ताब्यात घेता येणे सहजशक्य होणार आहे. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे शहरयार खान यांनी सांगितले. 

दरम्यान, भारतातील पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोट येथे भारताने हवाई हल्ला चढवला. यावेळी भारतीय मिग विमान पाकिस्तान हद्दीत कोसळले. त्यावेळी भारतीय नौदलाचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तान सैन्याने ताब्यात घेतले. मात्र, भारताने दबाव वाढविल्यानंतर अभिनंदनची ६० तासानंतर सुटका करण्यात आली. आता भारताच्या दबावानंतर मसूद अझरच्या भावाला पाकिस्तानने अटक केली.