भारत चंद्रावर पोहोचला, आता आमचे पैसे परत करा, ब्रिटनच्या अँकरची मुक्ताफळे; भारतीयांनी हिशोब दिला

Chandrayaan 3: भारताने चंद्रावर तिरंगा फडकावल्यानंतर संपूर्ण देशात मोठ्या जल्लोष साजरा केला जात आहे. मात्र, ब्रिटनच्या एका अँकरला मात्र भारताचे हे यश पाहावले गेले नाही. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 25, 2023, 03:52 PM IST
भारत चंद्रावर पोहोचला, आता आमचे पैसे परत करा, ब्रिटनच्या अँकरची मुक्ताफळे; भारतीयांनी हिशोब दिला title=
British TV anchor Faces Flak For Asking India To Return 23 Billion After Chandrayaan 3 Lands On Moon

British TV Anchor On  Chandrayaan 3: 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून ०४ मिनिटांना चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला गवसणी घालणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तर, चंद्रावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिग करणारा चौथा देश ठरला आहे. भारताच्या या यशाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मात्र, युनायटेड किंगडमच्या एका अंकरला मात्र भारताचे हे यश खटकलं आहे. एका कार्यक्रमात त्यांने चांद्रयानाच्या यशाबाबत अभिनंदन करताना आता भारताने ब्रिटनला पैसे परत करावेत, अशी मुक्ताफळे उधळली आहेत. या वक्तव्यानंतर भारतीयांनी त्याची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. तर, कोहिनूरचा दाखल देत त्याची बोलतीच बंद केली आहे. 

ब्रिटनच्या अँकरने एका कार्यक्रमात म्हटलं आहे की, भारताने ब्रिटनचे पैसे परत दिले पाहिजेत. तसंच, ज्या देशांच्या अंतराळ मोहिमा आहेत अशा देशांना ब्रिटनने पैशांची मदत करणे थांबवले पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. पॅट्रिक क्रिस्टिस असं या टिव्ही अँकरचे नाव असून भर कार्यक्रमात भारताबद्दल काय म्हणाला आहे, हे सविस्तर जाणून घेऊया. 

भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिग केले आहे. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. त्याचबरोबर, मी भारताकडे एक मागणी करतो की त्यांना आमचे 2.3 बिलियन पाउंड्स (24 हजार कोटी) परत करावेत. जे आम्ही 2016 ते 2021मध्ये मदत म्हणून दिले होते. तर, पुढच्या वर्षी आम्ही भारताला 57 मिलियन पाउंड्स (595 कोटी) देणार आहोत. आपल्या देशातील लोकांनी हे थांबवायला हवं. आपल्याला एक नियम बनवायला हवे. ज्या देशाच्या स्वतःच्या अंतराळ मोहिमा आहेत, त्यांना आपल्या देशाने पैसे देणे थांबवले पाहिजे, असं पॅट्रिकने म्हटलं आहे. 

जर तुम्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत यान पाठवू शकता तर तुम्हाला आमच्याकडून पैसे मागितले नाही पाहिजेत. एका रिपोर्टनुसार भारतात 229 मिलियन (22.9 कोटी) लोक गरीब आहेत. खरं तर भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. यांची अर्थव्यवस्था ही जवळपास 3.75 ट्रिलियन डॉलर्स (250 लाख कोटी) आहेत. आपण भारताच्या गरिबाची मदत का करत आहोत. जेव्हा त्यांच्या सरकारलाच त्यांची काही चिंता नाही, असं त्याने म्हटलं आहे. 

पॅट्रिकने स्वतःच हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यानंतर भारतीयांनी पॅट्रिकला खडे बोल सुनावले आहेत. एका व्यक्तीने खास शैलीत त्याच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ब्रिटनने आमचे 44.997 ट्रिलियन परत करावेत. अनुदानाविषयी आठवण करुन देण्यास धन्यवाद. आता आमच्याकडून लुटलेले 45 ट्रिलियन डॉलर परत करा. ब्रिटटने आम्हाला 2.5 बिलियन दिले आहेत. ते कापून घ्या व उरलेले 45 लाख कोटी आम्हाला परत करा, असं एका ट्विटर युजर्सने सुनावले आहे. 

तर, काही युजर्सने पेट्रिकला कोहिनूर हिरा परत करण्यास सांगितले आहे. तर, पेट्रिकलच्या या ट्विटवर फक्त भारतीयच नाही तर जगभरातील लोकांनी त्याला खरं खोट सुनावले आहे. तर, ट्विटरवही वॉर छेडले होते.