लंडन : ब्रिटनमध्ये सध्या शाही विवाह सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. ब्रिटनचा राजकुमार हॅरी आणि मेगन मार्केल यांचा शाही विवाह सोहळा येत्या १९ मे रोजी होणार आहे. त्यासाठी ब्रिटनच्या सैन्याचीही लगबग सुरु आहे. जगभरातील मोजक्याच प्रतिष्ठित व्यक्तींना या विवाहसोहळ्याला आमंत्रण देण्यात आलंय. या विवाह सोहळ्याला आहेर न आणता ती रक्कम जगभरातील सात स्वयंसेवी संस्थांना दान करण्यात यावी, असं आवाहन हॅरी आणि मेगन मार्केल या जोडीनं केलंय.
प्रिन्स हॅरी आणि मेगन यांचा विवाह विंडसर कॅसल येथील सेंट जॉर्ज्स चॅपेलमध्ये होणार आहे. त्यानंतर शाही दाम्पत्याची बग्गीतून विंडसर शहरातून मिरवणूक काढण्यात येईल आणि नंतर सेंट जॉर्ज्स हॉल येथे स्वागत सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाची घोषणा गेल्या वर्षीच करण्यात आली आहे.जगभरातून हजारो नागरिक या विवाह सोहळ्यासाठी विंडसर येथे दाखल होणार आहेत. हा विवाह सोहळा थाटामाटात व्हावा, यासाठी राजघराण्याकडून जोरदार तयारी सुरू आहे.