लंडन: ब्रेक्झिटच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यासाठी अवघे १७ दिवस शिल्लक राहिले असताना इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना मोठा धक्का बसला आहे. ब्रिटनच्या संसदेने दुसऱ्यांदा मे यांचा ब्रेक्झिट संदर्भातील प्रस्ताव नाकारला आहे. ३९१ विरुद्ध २४२ मतांनी हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. ब्रेक्झिटनुसार येत्या काही दिवसांत ब्रिटन आणि युरोपियन महासंघ विलग होणार आहेत. तत्पूर्वी दोघांतील वाटाघाटींना ब्रिटनच्या संसदेकडून मंजुरी मिळणे आवश्यक आहे. मात्र, संसदेने थेरेसा मे यांनी सादर केलेला प्रस्ताव पुन्हा एकदा नाकारला. आता बुधवारी संसदेत आणखी एक मतदान होईल. यावेळी ब्रिटनने कोणत्याही वाटाघाटी न करता युरोपियन महासंघातून बाहेर पडायचे का, यावर निर्णय होईल. हा प्रस्तावही नाकारला गेल्यास ब्रेक्झिटसाठी आणखी वेळ मागण्याच्या प्रस्तावासाठी संसदेत मतदान घ्यावे लागेल.
तब्बल ४६ वर्ष एकत्र नांदल्यानंतर ब्रिटनच्या जनतेने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा कौल दिला होता. मात्र, त्यामुळे ब्रिटन आर्थिक संकटात सापडण्याची दाट शक्यता आहे. याविषयी बोलताना युरोपियन महासंघाचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी सांगितले की, ब्रिटीश संसदेने हा प्रस्ताव नाकारल्यामुळे मी खूप निराश झालो आहे. आमच्याकडून वाटाघाटींसाठी सर्वतोपरी प्रयत्न झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
२३ जून २०१६ रोजी झालेल्या सार्वमतात ब्रिटनच्या नागरिकांनी ५२ टक्के विरुद्ध ४८ टक्के अशा बहुमताने २८ देशांच्या युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने कौल दिला होता. सरकारने निश्चित केलेल्या दोन वर्षांच्या वेळापत्रकानुसार ब्रिटनला येत्या २९ मार्चला महासंघातून बाहेर पडावे लागणार आहे. त्यापूर्वी ब्रिटन पार्लमेंटमध्ये हा करार मंजूर होणे आवश्यक होते. आता ब्रिटनने विनंती केल्यास मुदतवाढ दिली जाईल पण त्यासाठी ब्रिटनला महासंघातील २७ सदस्य देशांना यासाठी समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे लागेल.