काबूल : सुधारणावादी विचारांचा दावा करणा-या तालिबान्यांचा बुरखा पुन्हा एकदा फाटलाय. आम्ही कुणाच्या हक्कावर गदा आणणार नाही. महिलांच्या शिक्षणाचा हक्क अबाधित राखू असं म्हणणा-या तालिबाननं आता एक अजब फतवाच जारी केलाय. अफगाणिस्तानात आता यापुढे शाळा कॉलेजांमध्ये मुला-मुलींना एकत्र शिकता येणार नाही. (boys and girls will no longer be able to study together in schools and colleges under talibani rule)
अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबान्यांनी आपला खरा चेहरा दाखवून दिलाय. आम्ही महिलांना शिक्षणापासून रोखणार नाही, त्यांचे हक्क अबाधित राखू असं सांगणा-या तालिबान्यांनी आता एक अजब फतवा जारी केलाय. ज्यात मुला-मुलींना यापुढे एकत्र शिकता येणार नाही असं म्हंटलंय. खामा न्यूजला दिलेल्या मुलाखतीत तालिबानच्या शिक्षण मंत्रालयाचे प्रमुख अब्दुल हक्कानी यांनी ही फतवा काढलाय.
खामा न्यूजच्या रिपोर्टनुसार, नव्या शासन प्रणालीत मुलींना शिक्षणाचा अधिकार असेल. मात्र त्यांना मुलांसोबत एकत्र शिकता येणार नाही. मुस्लीम कायद्यानुसार त्यांना वेगवेगळ्या वर्गात बसून शिकावं लागेल. तशा सूचना सरकारी आणि खासगी महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत असंही हक्कानी यांनी म्हंटलंय.
तालिबान्यांच्या फतव्यामुळे अफगाणिस्तानातील मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होतीय. मुळात मुला-मुलींना स्वतंत्रपणे शिक्षण देण्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ आणि बैठक व्यवस्था इथल्या महाविद्यालयांमध्ये नाही. त्यामुळे स्वाभाविकच या निर्णयांमुळे विद्यार्थिनींच्या संख्येत घट होईल. महिलांना शिक्षणापासून रोखणं हा धर्मांध तालिबान्यांचा सुरूवातीपासूनच अजेंडा राहिलाय. त्यामुळे बदलल्याचा कितीही आव आणला तरी तालिबान्यांचा खरा चेहरा उघड झाल्याचं या फतव्यातून स्पष्ट होतंय.