पाकिस्तानच्या ग्वादर शहरात भीषण बॉम्ब स्फोट, चीनच्या 6 अभियंत्यांचा मृत्यू

या हल्ल्यामागे तालिबान्यांच्या हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय, पण अद्याप कोणत्याही संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही

Updated: Aug 20, 2021, 11:00 PM IST
पाकिस्तानच्या ग्वादर शहरात भीषण बॉम्ब स्फोट, चीनच्या 6 अभियंत्यांचा मृत्यू title=

लाहौर : पाकिस्तानात (Pakistan) भीषण बॉम्ब स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या ग्वादर शहरात झालेल्या या स्फोटात चीनच्या 6 अभियंत्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. हा बॉम्ब स्फोट बलोच फायटर (Baloch Fighters) यांनी घडवून आणल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. 

पाकिस्तानात चीनी अभियंत्यांना लक्ष्य करत झालेला हा दुसरा मोठा बॉम्ब हल्ला आहे. याआधी पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात बसमध्ये झालेल्या स्फोटात 9 चिनी अभियंते ठार झाले होते. पाकिस्तानने बसमध्ये झालेल्या स्फोटाला तांत्रिक बिघाडाचं कारण देत झालेली दुर्घटना सांगितलं होतं. या दहशतवादी हल्ल्यामुळे चिनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सर्व चीनी नागरिकांच्या सुरक्षिततेचं आश्वासन दिलं होतं. पण चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) च्या कामात गुंतलेल्या चिनी कामगारांची भीती कमी झालेली नाही. 

गुरुवारीही पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील बहावन नगरमध्ये शिया समुदायाच्या मिरवणुकीवर हल्ला झाला. या हल्ल्यात 5 जण ठार झाले आणि सुमारे 40 लोक जखमी झाले. हल्ल्यानंतर घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. याचा फायदा घेत हल्लेखोर तिथून पळून गेले. अफगाणिस्तानातील कट्टरपंथी तालिबान्यांच्या कब्जाचा हा दुष्परिणाम असल्याचं बोललं जात आहे.