नवी दिल्ली : सध्या एअरटेलचा बिझिनेस आफ्रिकेतल्या १५ देशांमध्ये पसरलेला आहे.
मिलीकॉम इंटरनॅशनल सेल्युलर एसए बरोबर एअरटेलने अलिकडेच करार केलाय. या करारामुळे मिलीकॉम इंटरनॅशनलचा रवांडामधील सगळा व्यापार एअरटेलच्या ताब्यात येणार आहे. मिलीकॉम इंटरनॅशनल रवांडामध्ये टिगो या नावाने सर्विस देते. एअरटेलने या संदर्भात एक पत्रक काढून माहिती दिली आहे.
या करारामुळे रवांडामध्ये एअरटेलबरोबर ३७ कोटी ग्राहक जोडले जाणार आहेत. या टेकओव्हरमुळे एअरटेल रवांडामधील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी होणार आहे. कंपनीला यातून ८ कोटी डॉलर्सचं उत्पन्न मिळणार आहे. एअरटेलचा बाजारातला हिस्सा ४० टक्के असणार आहे.
याआधीसुद्धा एअरटेलने टिगोबरोबर घानामध्ये य़शस्वीरित्या बिझिनेस केला आहे. घानामधली ती आता महत्वाची टेलिकॉम कंपनी बनली आहे. एअरटेलने आफ्रिकेतल्या तब्बल १५ देशांमध्ये हातपाय पसरले आहेत. यातून एअरटेलला भरघोस उत्पन्न मिळणार आहे. आफ्रिका खंडातली ती सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी झाली आहे. जवळपास ८.३ कोटी ग्राहक एअरटेलने जोडले आहेत.