Human Encounters With Alien: विश्वाचा पसारा किती मोठा आहे याचा अंदाज अद्याप अंतराळ संशोधन करणाऱ्यांनाही आलेला नाही असं म्हटलं जातं. त्यामुळेच जीवसृष्टी असलेला पृथ्वी हा एकमेव ग्रह असेल असं म्हणणं चुकीचं ठरेल असा दावा करणारे अनेक संशोधक आहेत. मागील अनेक दशकांपासून मानव परग्रहावर जीवसृष्टी आहे का? किंवा यापूर्वी होती का? याचा शोध घेत आहे. अगदी पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्रापासून ते मंगळापर्यंत पाण्याचा अंश शोधण्याचा प्रयत्न मानवाकडून केला जात आहे. त्याचप्रमाणे पृथ्वीप्रमाणे जीवसृष्टी निर्माण होऊ शकते असे काही ग्रह अस्तित्वात आहे का याचा शोध वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेतला जात आहे. विशेष म्हणजे मानवला असलेले परग्रहावरील जीवसृष्टीची ओढ ही काही मागील काही दशकांमधील नसून फार जुनी आहे. मात्र मागील काही दशकांमध्ये तंत्रज्ञान अधिक विकसित झाल्याने या नव्या शोधांचा वेग वाढला आहे. मात्र मानवाचा परग्रहावरील सजीवाशी नेमका संपर्क कधी होणार हे ठामपणे सांगता येणार नाही. असं असलं तरी काही वर्षांपूर्वीच एका महिलेने मानव आणि परग्रहावरील जीवांची पहिली गाठभेट ही सन 2025 मध्ये होईल असं भाकित व्यक्त केलेलं आहे.
ज्या महिलेने हे भाकित व्यक्त केलं आहे तिचं नाव आहे बाबा वेंगा! अर्थात तुम्ही इंटरनेट नियमितपणे वापरत असाल तर हे नाव यापूर्वी अनेकदा ऐकलं किंवा वाचलं असता. वयाच्या 86 व्या वर्षी 1996 साली अखेरचा श्वास घेणाऱ्या बाबा वेंगा यांनी सन 5079 पर्यंतच भाकित सूचक पद्धतीने व्यक्त केलं आहे. जगभरात घडणाऱ्या घडामोडींचा संदर्भ बाबा वेंगांनी व्यक्त केलेल्या अनेक भाकितांशी तंतोतंत जुळला आहे. यापूर्वी वर्ल्ड ट्रेण्ड सेंटरवरील अपघात, आर्थिक मंदी, कोरोनाची लाट यासारख्या अनेक गोष्टींचं भाकित बाबा वेंगा यांनी अचूकपणे मांडल्याचा दावा केला जातो. वयाच्या 12 व्या वर्षी बाबा वेंगा यांनी दृष्टी गमावली. मात्र त्यांनी ज्या विचित्र अपघातामुळे दृष्टी गमावली त्याच अपघातात त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाल्याचं मानलं जातं. त्यानंतर त्यांनी मांडलेली भाकितं आणि तर्क आजही अनेकदा खरी ठरतात. असंच भाकित त्यांनी परग्रहावरील जीवसृष्टीसंदर्भात व्यक्त केलं आहे.
2025 मध्ये परग्रहावरील जीव पहिल्यांदाच मानवाच्या संपर्कात येतील असा दावा बाबा वेंगा यांनी केला आहे. 'मानवाला पहिल्यांदाच हे परग्रहावरील जीव आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देतील ते वर्ष 2025 असेल' असं बाबा वेंगांच्या भविष्यवाणीवरुन स्पष्ट होत आहे. बाबा वेंगा यांनी यापूर्वी व्यक्त केलेली अनेक भाकितं खरी ठरली आहेत. त्यामुळेच परग्रहावरील लोकांसंदर्भातील त्यांचं भाकित खरं होईल हा अंदाजही खरा ठरेल असेच मानले जात आहे. पण परग्रहावरील जीवांचा सामना करण्याची वेळ खरंच पुढील वर्षी मानवावर आली तर त्याचे होणाऱ्या परिणामांसाठी आपण तयार आहोत का याबद्दल आतापासूनच चर्चा होऊ लागली आहे.
खरंच बाबा वेंगा यांनी केलेल्या दाव्यानुसार मानवाचा सामना परग्रहावरील जीवांशी झाला तर अंतराळ आणि संपूर्ण विश्वाच्या उत्पत्तीचं कोडं उलगडण्याच्या प्रवासामधील हा टर्निंग पॉइण्ट ठरु शकतो. मात्र अनेकांचं असंही म्हणणं आहे की ठोस पुराव्यांशिवाय बाबा वेंगांची भविष्यवाणी म्हणजे केवळ अंदाज बांधण्यासारखा प्रकार आहे.