पहिल्या भेटीत किमान 'या' चुका करू नका

कारण... First impression is the Last impression

Updated: Jan 21, 2019, 03:24 PM IST
पहिल्या भेटीत किमान 'या' चुका करू नका  title=

मुंबई : आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपली भेट अशा काही व्यक्तींशी होते जे कायम स्मरणात राहतात. मुळात बऱ्याचदा ती भेट अवघ्या काही मिनिटांची, काही सेकंदांचीही असते. काहींचं नावही आपल्याला ठाऊक नसतं. पण, तरीही त्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वामुळे एक वेगळाच प्रभाव आपल्यावर पडलेला असतो कारण, First impression is last impression म्हणतात ते अगदी खरंच आहे. 

अनेकदा व्यक्तिगत पणे कोणाला पहिल्यांदाच भेटण्याची वेळ येते तेव्हा अजाणतेपणाने बरेचजण काही चुका करतात. ज्यामुळे पहिल्याच भेटीनंतर तुमच्याविषयीचे पूर्वग्रह बांधले जाऊ लागतात, चुकीचे समज आकारास येतात. या साऱ्या गोष्टी टाळण्यासाठी आणि पहिल्याच भेटीत आपल्या व्यक्तिमत्त्वाने छाप पाडण्यासाठी किमान खालील चुका टाळा.

कोणत्याही कारणासाठी अतिउत्साह दाखवू नका- 

पहिल्या भेटीत आपल्या व्यक्तीमत्त्वाची छाप पाडण्यासाठी म्हणून नकळत अतिउत्साहीपणे गोष्टी बिघडू शकतात. त्यामुळे प्रभाव पाडण्याच्या नादात उगाचच अतिउत्साह दाखवण्यात अर्थ नाही. अनेकदा हीच चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते. 

खासगी आणि भूतकाळातील गोष्टींचा लगेचच खुलासा करु नका- 

पहिली भेट ही कामाच्या निमित्ताने असो किंवा मग अगदी सहजपणे होणारी असो, सरसकट स्वत:च्या खासगी आणि भूतकाळातील आयुष्याविषयी मोकळेपणाने व्यक्त होण्याची घाई करणं टाळावं. समोरची व्यक्ती कोण आहे, त्यांची जीवनशैली नेमकी कशी आहे, त्यांच्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे, काय घडलं आहे याची तुम्हालाही फारशी कल्पना नसते. त्यामुळे खासगी आयुष्याविषयी व्यक्त होताना जरा जपूनच. नात्यात निर्माण होणारी सहजता आणि एक अनामिक बंध जाणवल्यानंतर या गोष्टींविषयी बोलणं कधीही उत्तम. 

तुमच्या मताशी इतरही सहमत असतील असं नाही-

पहिल्याच भेटीत धर्म, पंथ, राजकारण अशा विषयांवर थेट चर्चा करणं किंवा संवेदनशील मुद्द्यांवर आपली मतं मांडणं सहसा टाळावं. पण, तरीही असे विषय निघाल्यास आणि चर्चा झाल्यास तुमच्या मताशी समोरची व्यक्तीही सहमत असेलच असं नाही. त्यामुळे तसा अंदाजही बांधणं म्हणजे घोडचूक ठरेल. 

वैयक्तिक आयुष्यात डोकावू नका-

पहिली भेट विशेषत: जी अगदी सहज झालेली असते तेव्हा अनेकदा खासगी आणि वैयक्तिक आयुष्याविषयीचे मुद्दे निघतात. कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरीही एका टप्प्यावर विषय निघायचे ते निघतातच. पण, अशा वेळी समोरच्या व्यक्तीचा कल पाहूनच वक्तव्य करणं कधीही चांगलं. गतजीवनाच्या आठवणी, घटना, समजुती, मानसिक आरोग्याविषयीच्या गोष्टी या साऱ्याविषयी पहिल्याच भेटीत चर्चा नको. इतरांच्या वैयक्तिक आयुष्यात असं पहिल्या भेटीतच डोकावणं हे अनेकदा वाईट दिसतं, सोबतच समोरच्याला ते रुचतही नसतं. त्यामुळे कोणाला पहिल्यांदाच भेटत असाल तर किमान या चुका करू नका.