भारताच्या लष्कर प्रमुखांच्या वक्तव्याने चीनला मिरच्या का लागल्या ?

भारताच्या लष्कर प्रमुखांच्या वक्तव्याने भारत-चीन संबंधांना खीळ बसेल.

Updated: Jan 15, 2018, 09:32 PM IST
भारताच्या लष्कर प्रमुखांच्या वक्तव्याने चीनला मिरच्या का लागल्या ? title=

बीजिंग : भारताच्या लष्कर प्रमुखांच्या वक्तव्याने भारत-चीन संबंधांना खीळ बसेल.

चिनी कांगावा

चीनने भारतीय लष्कर प्रमुखांवर आगपाखड केली आहे. भारतीय लष्कर प्रमुखांनी डोकलाम मुद्दयावर भाष्य केलं होतं. त्यांच्या याप्रकारच्या वक्तव्याने भारत-चीन संबंधांमध्ये अडचणी निर्माण होतील, असं चीनने म्हटलंय.

लष्कर प्रमुखांनी वर्मावर ठेवलं बोट

भारताचे लष्कर प्रमुख जनरल बीपिन रावत यांनी डोकलाम ही एक वादग्रस्त जागा असल्याचं म्हटलं होतं. भारताच्या सीमांबाबत बोलताना लष्कर प्रमुख म्हणाले की भारताने आपलं लक्ष पाकिस्तानबरोबरच्या सीमेवरून काढून चीनबरोबरच्या सीमेवर केंद्रीत केलं पाहीजे. चीनपासून भारताला भविष्यातला मोठा धोका आहे हेच लष्कर प्रमुखांना सुचवायचे होते.

चीनच्या उलट्या बोंबा

लष्कर प्रमुख जनरल बीपिन रावत यांच्या विधानातली खोच नेमकेपणाने चीनच्या लक्षात आल्याने चीनचा तीळपापड झाला आहे. चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांत भारत चीनमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र दोन्ही देशांनी द्विपक्षीय चर्चा आणि समन्वय वाढवत तो तणाव कमी केला होता. यात दोन्ही देशांच्या नेतृत्वाने महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र भारताच्या लष्कर प्रमुखांच्या या वक्तव्याने दोन्ही देशांच्या संबंधांना तडा जाऊ शकतो. यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमधला पारदर्शकपणा कमी होऊ शकतो, असं चीनी प्रवक्त्याने म्हटलं आहे.