Arctic Ocean Ice Melting : आर्क्टिक महासागरात जमा झालेला बर्फ प्रचंड वेगाने वितळत आहे. 2027 पर्यंत आर्क्टिक महासागरातील सर्व बर्फ वितळेल अशी भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे. आर्क्टिक महासागरातील सर्व बर्फ वितळल्यास या परिसरात उष्णतेचा कहर होईल. यानंतर अनेक संकट निर्माण होतील अशी भिती देखील संशोधकांनी व्यक्त केली आहे.
एका आंतरराष्ट्रीय संशोधन संघाने याबाबतचे संशोधन केले आहे. आर्क्टिक महासागराती बर्फ वितळण्याच्या वेगाचा अंदाज लावण्यासाठी प्रगत संगणक मॉडेल्सचा वापर करण्यात आला. या टीममध्ये अमेरिकेतील कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील हवामान शास्त्रज्ञ अलेक्झांड्रा जॉन आणि गोथेनबर्ग विद्यापीठाच्या सेलिन ह्यूजेस यांचाही समावेश आहे. आर्क्टिक महासागराती बर्फ वितळल्यास याचे काय परिणाम होतील याबाबतचे संशोधन 'नेचर कम्युनिकेशन्स' जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
आर्क्टिक प्रदेशात ग्लोबल वॉर्मिंगचा गंभीर परिणाम पहायला मिळत आहे. जागतिक तापमान वाढीमुळे आर्क्टिक प्रदेशातील बर्फ झपाट्यानं वितळू लागलंय. गेल्या 30 वर्षांच्या तुलनेत येथील तापमानात दुपटीनं वाढ झालीये. यामुळे आर्क्टिक प्रदेशातील ध्रुवीय अस्वल, सील, प्लवक तसंच एकपेशीय वनस्पतींचं अस्तित्त्व धोक्यात आलंय. मानवासाठी देखील ही एक धोक्याची घंटा असल्याचं वैज्ञानिकांनी म्हटलं.
जॉन आणि ह्यूजेस यांच्या नेतृत्वाखालील टीमने केलेल्या संशोधनात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्क्टिक समुद्रातील बर्फ दर दशकात 12% पेक्षा जास्त वेगाने कमी होत आहे. हरितगृह वायूंच्या वाढत्या उत्सर्जनाचा हा परिणाम आहे. या वर्षी, आर्क्टिक समुद्रातील बर्फाचे किमान प्रमाण 4.28 दशलक्ष चौरस किलोमीटर नोंदवले गेले. जे 1978 मध्ये नोंदी सुरू झाल्यापासून सर्वात कमी पातळीपैकी एक आहे. जर बर्फाचे क्षेत्र 1 दशलक्ष चौरस किलोमीटरच्या खाली आले. आर्क्टिक बर्फमुक्त झाल्यास भयान परिणाम होतील अशी भिती व्यक्त केली जात आहे.