ट्रम्प यांच्याविरोधातला महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर

२३० विरूद्ध १९७ मतांनी या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. 

Updated: Dec 19, 2019, 08:19 AM IST
ट्रम्प यांच्याविरोधातला महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर title=

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ट्रम्प यांच्याविरोधातला महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटीव्हज अर्थात खालच्या सभागृहात हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. २३० विरूद्ध १९७ मतांनी या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. 

सत्तेचा गैरवापर आणि विविध चौकश्यांमध्ये अडथळे निर्माण करण्याचे आरोप ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. मात्र हा प्रस्ताव सिनेटमध्ये मंजूर होणं कठीण आहे. कारण सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या बाजूनं बहुमत आहे. 

महाभियोगा अंतर्गत कारवाई करण्यासाठी सिनेटमध्ये म्हणजे वरच्या सभागृहातही हा प्रस्ताव मंजूर करावा लागेल.

ट्रम्प यांनी घटनेची पायमल्ली केली असून त्यांच्यापासून राष्ट्रीय सुरक्षा आणि नि:पक्ष निवडणूक प्रक्रियेला धोका असल्याचं यूएस हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी म्हटले आहे.

महाभियोग म्हणजे काय?

कायदे मंडळामार्फत एखाद्या घटनात्मक पदावरील व्यक्तीला पदावरून दूर करण्यासाठीच्या प्रक्रियेला महाभियोग असं म्हणतात.

अमेरिकेत महाभियोग चालला की व्यक्तीला पदावरुन बाजूला व्हावेच लागते असे नाही.

ट्रम्प यांच्या बाबतीत त्यांनाही पदावरून बाजूला व्हावे लागेल असे दिसत नाही.

कारण सीनेट म्हणजे जिथे महाभियोग चालणार आहे तिथे ट्रम्प यांच्या पक्षाला बहुमत आहे.