नवी दिल्ली : कोरोना संसर्गाबाबत संशोधकांनी एका नवीन माहितीबाबत दावा केला आहे. कोरोना व्हायरसचा रुग्ण 11 दिवसांनंतर संसर्ग पसरवू शकत नाही, 12व्या दिवशी जरी कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह असला तरी, त्या रुग्णाकडून संसर्ग होऊ शकत नसल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
nypost.comच्या रिपोर्टनुसार, सिंगापूर नॅशनल सेंटर फॉर इन्फेक्शन डिसिजेस (NCID) अँड अकॅडमी ऑफ मेडिसिन यांच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
सिंगापूर नॅशनल सेंटर फॉर इन्फेक्शन डिसिजेजने जवळपास 73 कोरोना रुग्णांवर अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान त्यांना याबाबत माहिती मिळाली. संशोधकांनी सांगितलं की, 11 दिवसांनंतर कोरोना व्हायरसला आयसोलेट केलं जाऊ शकत नाही.
सिंगापूरच्या NCIDचे कार्यकारी संचालक लिओ यी सिन यांनी, संशोधकांना या नवीन माहितीबद्दल आत्मविश्वास असल्याचं सांगितलं. वैज्ञानिकदृष्ट्या मला खात्री आहे की, 11 दिवसांनंतर कोरोना रुग्ण संसर्गजन्य होत नसल्याचा पुरेसा पुरावा आहे, असं ते म्हणाले.
लक्षणं दिसल्यानंतर एक आठवड्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये ऍक्टिव्ह वायरल रेप्लिकेशन घटण्यास सुरुवात होते. त्यामुळे नव्या माहितीच्या आधारे, रुग्णाला कधी डिस्चार्ज द्यावा याबाबत रुग्णालयं निर्णय घेऊ शकतात.
दरम्यान, कोरोना रुग्ण जोपर्यंत पॉझिटिव्ह आहे तोपर्यंत संसर्ग होत असल्याचा आतापर्यंतचा समज आहे. संशोधकांनीही लक्षणं दिसण्याच्या दोन दिवस आधीपासूनच कोरोना रुग्ण, संसर्ग पसरवू शकत असल्याचं सांगितलं होतं. कोरोना रुग्णांमध्ये लक्षणं दिसल्यापासून 7 ते 10 दिवसांनंतरही संसर्ग पसरवण्याची क्षमता असल्याचं, अभ्यासादरम्यान संशोधकांनी सांगितलं होतं.