घरात बहिण-भावाची भांडणं होणं तशी पालकांसाठी सामान्य बाब आहे. पण काही वेळा त्यांच्यातील भांडणं सोडवताना पालकांची दमछाक होते. प्रत्येक कुटुंबात ही समस्या वेगवेगळी किंवा त्याचं कारण वेगळं असू शकतं. घरातील ही भांडणं घरातच मिटवण्याचा पालकांचा प्रयत्न असतो. पण चीनमधील हुनान प्रांतात एक अजब प्रकार झाला आहे. येथे 10 वर्षांच्या एका मुलाने वडिलांची तक्रार करण्यासाठी थेट पोलीस स्टेशन गाठलं. मुलाने पोलीस स्टेशनला जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. मुलगा तब्बल आठव्यांचा वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात पोहोचला होता.
28 जानेवारीला मुलगा पोलीस ठाण्यात पोहोचला तेव्हा ती त्याची आठवी वेळ होती. एका व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, मुलगा पोलीस कर्मचाऱ्याच्या शेजारी बसला आहे. यावेळी तो रडताना तसंच रागात दिसत आहे. आपले वडील मोठ्या बहिणीचे जास्त लाड करत असल्याची तक्रार तो कर्मचाऱ्याकडे करताना दिसतोय. यावेळी पोलीस कर्मचारी मुलाला विचारतो, 'तुला कोणामुळे एवढा राग येत आहे?' त्यावर मुलगा उत्तर देतो की, 'माझे वडील'.
दरम्यान इतकी थंडी असतानाही मुलाने कोट घातलेला नसतो. फक्त एक स्वेटशर्ट घालून तो पोहोचलेला असतो. पोलीस जेव्हा कपड्यांसंबंधी त्याला विचारतात तेव्हा तो उत्तर देण्याऐवजी रडू लागतो. त्याचवेळी मुलाचे वडील त्याचा कोट घेऊन पोलीस स्थानकात पोहोचतात आणि त्याला तो घालण्याचा प्रयत्न करतात.
वडील मुलाला विचारतात की, 'कोट घालतोस का?'. त्यावर तो ओरडून नाही असं उत्तर देतो. शांत झाल्यानंतर मुलगा अधिकाऱ्याला आपण वडिलांवर इतके का चिडलो आहोत याचं कारण सांगतो. तो म्हणतो की, "जेव्हा ते माझ्यासाठी कोट शोधतात तेव्हा मला नीट बसणारा कोट शोधायला त्यांना वेळ लागतो. म्हणूनच त्यांना माझा काळजी नाही असं मला वाटतं".
आपल्या मोठ्या बहिणीला वडील जास्त लक्ष आणि प्रेम देत असल्याचीही त्याची तक्रार आहे. आपला मुलगा आठव्यांदा पोलीस स्टेशनला गेल्याचं त्याच्या आईने सांगितलं आहे. दरम्यान त्याच्या आई-वडिलांनी आपण कामात व्यग्र असल्याने मुलामध्ये ती भावना निर्माण झाली असावी असं मान्य केलं. पण पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण मिटलं आहे. सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झाली आहे. अनेकांनी यावर कमेंट केल्या असून 'मुलगा फारच हुशार असून, त्याला समस्येवर तोडगा कसा काढायचा हे माहिती आहे' असं म्हटलं आहे.