Pilot Whales Stranded In Scottish Islands: स्कॉटलंडच्या (Scotland) उबड़-खाबड़ वेस्टर्न आइल्स समुद्रकिनारी रविवारी पायलट व्हेल्सचा (Pilot Whales) मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जवळपास 50 पायलट व्हेल्सने जीव गमावला आहे. समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पायलट व्हेल्स अडकले असल्याची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्यासाठी कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलं होतं. यानंतर सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पण तोपर्यंत 50 पायलट व्हेल्सचा मृत्यू झाला होता. यामधील फक्त 15 पायलट व्हेल्स वाचल्या आहेत.
ब्रिटिश डाइवर्स मरीन लाइफ रेस्क्यूच्या (BDMLR) कर्मचाऱ्यांनी पाण्यात बुडालेल्या व्हेल्सचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. यावेळी एका व्हेलने पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्याला पकडण्यात आलं. मात्र नंतर त्याचाही मृत्यू झाला. यासह इतर तिघांचाही मृत्यू झाला. 12 अद्याप जिवंत असल्याची माहिती आहे. जिवंत पायलट व्हेल्समधील 8 वयस्कर आणि 4 लहान आहेत.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बचावकार्यात सहभागी कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करुनही इतर व्हेल्सना पुन्हा पाण्यात आणू शकले नाहीत. अखेर कठोर निर्णय घेत रेस्क्यू ऑपरेटर्सना व्हेल्सना इच्छामृत्यू देण्याचा निर्णय घेतला.
BDMLR ने सांगितले की पहाटे 3.30 च्या सुमारास, स्थानिक पशुवैद्य, तटरक्षक दल, अग्निशमन, बचाव पथकं आणि एका न्यायवैद्यक पशुवैद्यकांनी निष्कर्ष काढला की उथळ समुद्रकिनारा आणि खडबडीत लाटांमुळे व्हेल्सला पाण्यात सोडणं असुरक्षित आहे. हे फार कठीण बचावकार्य होतं असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
रिपोर्टनुसार, बेटाच्या दुर्गमतेमुळे, वैद्यकीय आणि बचाव कर्मचार्यांना बचाव समन्वयकांशी संवाद साधण्यासाठी सिग्नल प्राप्त करण्यासाठी पाच मैलांपर्यंत गाडी चालवावी लागली. BDMLR कडे प्रतिसाद उपकरणांची कमतरता असल्याने त्याचा फायदा झाला नाही.
या सामूहिक मृत्यूचं कारण उलगडताना सांगण्यात आलं आहे की, बाळाला जन्म देण्यासाठी एक व्हेल समुद्रकिनारी आली होती. मृत व्हेलपैकी एक व्हेल गर्भवती होती. त्यामुळे एक मादी व्हेल बाळाला जन्म देत असल्याने सर्व व्हेल किनारी अडकले अशी शंका व्यक्त होत आहे.
तज्ज्ञांनुसार, पायलट व्हेल आपल्या दृढ सामाजिक बंधनांसाठी ओळखले जातात. म्हणजेच, त्याच्या समूहातील एक सदस्य जरी अडचणीत असेल किंवा अडकला तर इतरही व्हेल त्याचं अनुकरण करतात. दरम्यान, या व्हेल्सच्या मृत्यूचं कारण समजून घेण्यासाठी त्यांच्या मृतदेहांची तपासणी केली जाणार आहे.
पायलट व्हेल्सचा अडकल्याने मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेक देशांच्या सागरी किनाऱ्यावर पायलट व्हेल्सचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गेल्या वर्षी, न्यूझीलंडमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये, जवळपास 500 पायलट व्हेल्ल अशाच प्रकारे अडकून मृत्यूमुखी पडले होते. यानंतर, गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियातही मॅक्वेरी हार्बरजवळ सुमारे 230 व्हेल अडकले होते, त्यापैकी 200 मरण पावले.
यापूर्वी, दोन वर्षांपूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया राज्याच्या पश्चिम किनार्याजवळ सुमारे 500 पायलट व्हेल्स अडकल्या होत्या. त्या घटनेला सर्वात मोठी दुर्घटना म्हणून संबोधण्यात आलं होतं. त्यावेळी पायलट व्हेल्सना वाचवण्यासाठी आठवडाभर रेस्क्यू ऑपरेशन सुरु होतं. पण त्यावेळी फक्त 100 व्हेल्सला वाचवता आलं आणि 400 मरण पावल्या.