लेबनॉनमधून इस्रायलवर 34 रॉकेटचा मारा; पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतापले, म्हणाले आता 'आर या पार' लढाई

Israel launches strikes in Gaza :  लेबनॉनमधून इस्रायलवर 34 रॉकेटचा मारा केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतापले. त्यांनी तात्काळ घोषणा करुन कारवाईला सुरुवात केली. इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरु केले आहेत. 

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 7, 2023, 07:55 AM IST
लेबनॉनमधून इस्रायलवर 34 रॉकेटचा मारा; पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतापले, म्हणाले आता 'आर या पार' लढाई title=

Israel launches strikes in Gaza : इस्रायलने शुक्रवारी पहाटे गाझामध्ये प्रत्युत्तरादाखल हवाई हल्ले सुरु केले आहेत. त्यामुळे तणाव अधिक वाढला आहे. शेजारच्या लेबनॉनमधून इस्रायलच्या हद्दीत 34 रॉकेट डागल्यानंतर काही तासांनंतर इस्रायलने चोख प्रत्युतर दिले. इस्त्रायली सैन्याने पॅलेस्टिनी अतिरेक्यांना याबाबत जबाबदार धरले आहे. (Israel launches strikes in Gaza after barrage of rockets fired from Lebanon)

इस्रायलकडून थेट उत्तर, गाझा पट्टीवर हवाई हल्ले  

इस्रायली सैन्याने रॉकेट हल्ल्यांसाठी पॅलेस्टिनी बंडखोरांना याबाबत जबाबदार धरले. लेबनॉनच्या हद्दीतून इस्रायलवर हे रॉकेट डागण्यात आल्याचे लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, यापैकी 25 रॉकेट हवेत डागण्यात आले. या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतापले. त्यांनी तात्काळ घोषणा करुन कारवाईला सुरुवात केली. इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरु केले आहेत. एका निवेदनानुसार, इस्रायली सैन्याने सांगितले की ते सध्या गाझा पट्टीवर हल्ले करत आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, गाझा पट्टीच्या परिसरात रात्री 11.15 वाजता तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले.

हमासच्या अनेक प्रशिक्षण स्थळांना टार्गेट 

पॅलेस्टिनी सुरक्षा सूत्राने सांगितले की, हल्ल्यांमध्ये हमासच्या अनेक प्रशिक्षण स्थळांना टार्गेट करण्यात आले. एएफपीच्या वृत्तानुसार, पहिल्या हल्ल्याच्या अर्ध्या तासानंतर आणखी हल्ले करण्यात आले. तसेच, विमानांनेही परिसरात फिरतानाचे आवाज येत आहेत. त्यामुळे मोठा हवाई हल्ला करण्याच्या तयारीत इस्त्रायली सैन्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

लेबनॉनमधून रॉकेट डागल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जाहीर केले की, इस्रायलच्या शत्रूंना त्याची किंमत चुकवावी लागेल. ज्यूंच्या सुट्टीच्या दिवशी इस्रायलवर 34 रॉकेट डागण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील 2006 च्या युद्धानंतर पहिल्यांदाच इतके रॉकेट डागले गेले आहेत.

'कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही'

इस्रायली सैन्याने रॉकेट हल्ल्यांसाठी पॅलेस्टिनी बंडखोर गटांना जबाबदार धरले. मात्र, कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पत्रकारांशी बोलताना इस्रायली लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल रिचर्ड हेच म्हणाले, 'हा पॅलेस्टाईनचा हल्ला आहे. हे आम्हाला माहीत आहे. याच्यामागे 'हमास' असू शकतो. तो इस्लामिक जिहाद असू शकतो, आम्ही अद्याप स्पष्टपणे सांगू शकत नाही, परंतु हे स्पष्ट आहे की ते हिजबुल्ला नव्हते.

इस्रायल डिफेन्स फोर्सेसने ऑपरेशनची घोषणा केल्यानंतर काही मिनिटांनी गाझा शहरातील एका सीएनएन पत्रकाराने विमाने आणि स्फोटांचे आवाज ऐकले. पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासच्या ताब्यात असलेल्या किनारपट्टीच्या अनेक भागात इस्रायली हल्ले झाले. याला प्रत्युत्तर म्हणून गाझामधून इस्रायलच्या दिशेने अनेक रॉकेट डागण्यात आले. गाझामध्ये IDF च्या हल्ल्याच्या काही तास आधी, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इशारा दिला होता की इस्रायल 'आमच्या शत्रूंना मारणार आणि त्यांना प्रत्येक हल्ल्याची किंमत मोजावी लागेल.'