नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यातल्या नव्या संबंधांमध्ये नवा अध्याय लिहिण्याच्या हेतूनं दिल्लीत दोन्ही देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची एकत्र बैठक झाली. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पोम्पिओ, संरक्षण सचिव जिम मॅटिस, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह दोन्ही मंत्रालयाचे अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.
अतिशय महत्त्वाची आणि गोपनीय असलेलं संरक्षणविषयक तंत्रज्ञान भारताला देण्याबाबतचा बरीच चर्चा झालेला करार या बैठकीत पूर्णत्वास गेलाय. याखेरीज सीमेपलिकडून होणारा दहशतवाद, एच १ बी व्हीसा याबाबतही महत्त्वाची चर्चा या बैठकीत झाली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या कायम सदस्यत्वासाठी एकत्र प्रयत्न करण्याचा निर्णयही या मंत्रिस्तरीय बैठकीत घेण्यात आलाय.
भारत-अमेरिकेदरम्यान गुरुवारी चर्चेवेळी पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा’च्या दहशतवाद्यांना जागतिक दहशतवादी जाहीर करण्याबाबत अमेरिकेने सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी स्वागत केले. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर हा हल्ला करणार्या दहशतवाद्यांना शासन व्हावे, अशी आमची भूमिका आहे. त्यास अमेरिकेने समर्थन दिले असून त्या दृष्टीने पावले टाकली जाणार आहेत, असे सुषमा स्वराज म्हणाल्यात. जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझर याला जागतिक दहशतवादी जाहीर करण्यासाठी प्रयत्न केले जणार असल्याची अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे.