शहीद सैनिकांच्या कबरींवर तरुणींचा शॉर्ट ड्रेसमध्ये डान्स! संतापजनक Video समोर आल्यानंतर...

2 Ukrainian Women Dance On Graves Of Soldiers: तोकडे कपडे घालून या तरुणी शहीद सैनिकांच्या कबरींवर नाचत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 29, 2023, 08:58 AM IST
शहीद सैनिकांच्या कबरींवर तरुणींचा शॉर्ट ड्रेसमध्ये डान्स! संतापजनक Video समोर आल्यानंतर... title=
या महिलांनी डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वादाला तोंड फुटलं

2 Ukrainian Women Dance On Graves Of Soldiers: मागील दीड वर्षांहून अधिक काळापासून रशियाविरुद्ध युद्ध करणाऱ्या युक्रेनमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून कारवाई करण्यात आली आहे. युक्रेनचा स्वातंत्र्यता दिन म्हणजेच 24 ऑगस्ट रोजी शहीर झालेल्या सैनिकांना ज्या ठिकाणी दफन करण्यात आलं त्याच ठिकाणी काही तरुणींनी डान्स केला. याचा व्हिडीओ शूट करुन हा व्हिडीओ युक्रेनमधील या महिलांनी सोशल मीडियावर शेअर केला. इन्स्टाग्रामवरील vl_lindermann या हॅण्डलवरुन व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये या महिला शहीद सैनिकांच्या कबरींवर नाचल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलांवर कारवाई करण्यात आली. 

शहीद सैनिकांचे फोटोही दाखवले

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शहीद झालेल्या सैनिकांचे फोटोही दाखवण्यात आला आहे. या सैनिकांचे मृतदेह ज्या ठिकाणी दफन करण्यात आले आहेत तिथेच या महिला नाचताना दिसत आहेत. वाद झाल्यानंतर हा व्हिडीओ हटवण्यात आला आहे. इन्स्टाग्राम युझरने माफीनामा पोस्ट केला आहे. माझ्या वडिलांची कबर असलेल्या ठिकाणी जाताना आपण हा डान्स केल्याचं या तरुणीने म्हटलं आहे.

आता भोगावी लागणार ही शिक्षा

आरटी डॉट कॉमने किलेल्या वृत्तानुसार, युक्रेनमधील पोलिसांनी ही क्लिप आपल्याला सर्वात आधी गुरुवारी दिसल्याचं सांगितलं. राजधानी किव्हमधील पोलीस खात्याने यासंदर्भात एक पत्रकच जारी केलं आहे. "एका तासाहून कमी कालावधीमध्ये अधिकाऱ्यांनी या महिलांची ओळख पटवली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं," असं या पत्रात म्हटलं आहे. दोन्ही महिलांना 'सैनिकांच्या कबरींचा अपमान' केल्याचंही पोलिसांनी पत्रकात म्हटलं आहे. आता या महिलांना 'पाच वर्षांपर्यंतची शिक्षा' भोगावी लागेल असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

अनेकजणांनी व्यक्त केला संताप

मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या दोन्ही बहिणी तोकड्या कपड्यांमध्ये दफनभूमीवर गेल्याची माहिती नंतर समोर आली. पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतलं तेव्हा त्या याच कपड्यांमध्ये होत्या. पोलिसांनी या महिलांचे फोटो जारी केले आहेत. सोशल मीडियावर या महिलांवर टीकेची झोड उठली आहे. अनेकांनी या महिलांनी केलेलं कृत्य लज्जास्पद असल्याचा दावा केला आहे. काहींनी या महिलांच्या मनात शहीद सैनिकांबद्दल सन्मान नसल्याचं म्हटलं आहे. काहींनी या मुलींच्या डोक्यात मेंदू नसल्याची टीका केली आहे. या महिलांना समाजभान नसल्याचं काहींनी म्हटलं आहे. अशाप्रकारे शहिदांच्या कबरीवर जाऊन नाचणं जगातील कोणत्याच संस्कृतीला शोभणारं नाही असा दावाही अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.