आदिवासी तरुणांना पैठणीच्या माध्यमातून मिळाला रोजगार

ही बातमी आहे एका उद्योजिकेची.... माझ्या गावची पैठणी जगली पाहिजे, सातासमुद्रापार पोहोचली पाहिजे, म्हणून तिनं पैठण्यांचा उद्योग सुरू केला..... अशा प्रकारे पैठण्यांचा उद्योग करणा-या अनेक जणी आहेत..... पण अस्मिताचं एक वैशिष्ट्य आहे....

Updated: Dec 4, 2017, 03:29 PM IST
आदिवासी तरुणांना पैठणीच्या माध्यमातून मिळाला रोजगार title=

चेतन कोळस, झी मीडिया, येवला  : ही बातमी आहे एका उद्योजिकेची.... माझ्या गावची पैठणी जगली पाहिजे, सातासमुद्रापार पोहोचली पाहिजे, म्हणून तिनं पैठण्यांचा उद्योग सुरू केला..... अशा प्रकारे पैठण्यांचा उद्योग करणा-या अनेक जणी आहेत..... पण अस्मिताचं एक वैशिष्ट्य आहे....

अस्मिता गायकवाडचा जन्म येवल्यातलाच... शिक्षण एमएससी मायक्रो बॉयोलॉजी....  एखादी नोकरी करण्याऐवजी अस्मितानं ठरवलं गावच्या पैठणीचंच नाव आणखी समृद्ध करायचं.... अशा प्रकारे पैठण्यांचा व्यवसाय करणा-या अनेक जणी राज्यभरात आहेत... पण अस्मिताचं वेगळेपण म्हणजे तिनं स्वतःचे हातमाग टाकले.... आणि त्यासाठी आदिवासी भागातल्या मुलांना या हातमागांचं प्रशिक्षण दिलं. गडचिरोलीसारख्या भागांतून आदिवासी तरुणांना येवल्यामध्ये आणून त्यांना पैठणी विणण्याचं प्रशिक्षण दिलं.  आतापर्यंत अस्मितानं तब्बल पाचशे आदिवासी तरुणांना पैठणी विणण्याचं प्रशिक्षण दिलंय. अस्मिताच्या संस्थेतून शिकून बाहेर पडणाऱ्या मुलांना- तिनं स्वतःच नोकरी दिली, तर काहींनी स्वतःचा वेगळा व्यवसाय सुरू केला. 

पैठणीला फक्त साडीपुरतीच मर्यादित न ठेवता, तिनं त्यात वेगवेगळे प्रयोग केले... पैठणीचे कुर्ते, दुपट्टे, ज्वेलरी बॉक्स, पर्स, घरातल्या शोभेच्या फ्रेम अशा अनेक वस्तू तिनं पैठणीच्या धाग्यांतून गुंफल्या. 

गेली नऊ वर्षं अस्मिता पैठणीच्या या व्यवसायात आहे..... पैठणी सातासमुद्रापार पोहोचलीच... पण पैठणीला जगभर आणखी मान मिळावा, यासाठी अस्मिताचा प्रयत्न आहे.... म्हणूनच पैठणीची पारंपारिक साडीची चौकट मोडत आणखी वेगवेगळे प्रयोग करायची तिची इच्छा आहे... पण हे सगळं करत असताना अनेक आदिवासी मुलांना तिनं स्वतःच्या पायावर उभं केलंय, हे नक्कीच दाद देण्याजोगं...