आई झाल्यानंतर महिला स्वत:च्या सौंदर्याबद्दल असा विचार करतात...

९० टक्के महिला मोठ्या प्रमाणात सौंदर्य प्रसाधने वापरण्याच्या विरोधात 

Updated: Nov 22, 2018, 10:49 AM IST
आई झाल्यानंतर महिला स्वत:च्या सौंदर्याबद्दल असा विचार करतात... title=

मुंबई : आई झाल्यावर भारतीय महिलांच्या सौंदर्यविषयक संकल्पनेत बदल होत असल्याचं नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून समोर आलंय. 'मॉम्सप्रेसो'नं हे सौंदर्य सर्वेक्षण केलंय. या सर्वेक्षणात २५ ते ४५ अशा व्यापक वयोगटातील १११५ महिलांना समाविष्ट करण्यात आलं होतं. त्यातील जवळपास ६७ टक्के महिलांनी आई झाल्यावर त्यांची सौंदर्यविषयक कल्पना पार बदलून गेल्याचे मान्य केले. याउलट बाह्य रूपापेक्षा आंतरिक स्वास्थ्याला त्या अधिक महत्त्व देत असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. आई झाल्यावर भारतीय स्त्रीसाठी सौंदर्याची व्याख्या कशी बदलते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न मॉम्सप्रेसोनं केलाय.

मातृत्वाच्या आनंदासोबतच...

सौंदर्याच्या व्याख्येत बदल होण्यासाठीची महत्त्वाची कारणे म्हणजे स्वतःसाठी पुरेसा वेळ नसणे तसेच सतावणारी चेहऱ्याची आणि शरीराची चिंता... आई झाल्यावर दिवसभरात स्वतःच्या सौंदर्यासाठी घालवण्याच्या वेळेत ५०% पर्यंतची घट होत असल्याचे या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. मातृत्व प्राप्तीनंतर केस गळणे, पोट सुटणे, स्ट्रेच मार्क्स आणि ओघळलेले स्तन या शारीरिक चिंता त्यांना सर्वाधिक सतावत असतात.

बहुतांशी भारतीय मातांना तरुण दिसण्याचे दडपण नसते पण त्वचेचा असमान रंग, सुरकुत्या आणि काळे डाग यांची चिंता त्यांना सतावत असते. अनेक उत्पादने वापरल्यास पुढे जाता ते त्यांच्या सौंदर्यासाठी हानिकारक ठरू शकत असल्याची भीती असल्यामुळे शक्यतो त्या घरगुती इलाज करणे पसंत करतात.

सौंदर्याच्या बदलत्या व्याख्या...

५०% महिलांना असे वाटते की सौंदर्य हे उपजत असते आणि त्यात मागाहून फारसे काहीही करता येत नाही... तर ७०% महिलांना वाटते की, योग्य सौदर्य प्रसाधने वापरुन रूप खूप आकर्षक करता येऊ शकते. दुसरीकडे, या सर्वेक्षणात  असंही दिसून आलं की, प्रत्यक्षात ९०% महिला मोठ्या प्रमाणात सौंदर्य प्रसाधने वापरण्याच्या विरोधात आहेत. कारण त्यांना वाटते की, त्यामुळे पुढे जाता त्यांच्या सौंदर्याची हानी होऊ शकते व त्यामुळे ४ पैंकी ३ महिला घरगुती उपचार करणे पसंत करतात.

महिला सौंदर्याबद्दल प्रत्यक्षात काय विचार करतात आणि त्यांच्या रूपाशी निगडीत अडचणी याबाबतची परिस्थिती जाणून घेण्यासाठी मॉम्सप्रेसोनं हे सर्वेक्षण केलंय. 'महिला मातृत्वानंतर सौदर्याबाबत किती आश्चर्यकारकरित्या वेगळा विचार करतात... मुले लहान असताना वेळ ही मुख्य अडचण असते पण व्यापकदृष्ट्या महिला सौंदर्याबाबत कसा विचार करू लागतात, हे जाणून घेणं वेगळाच अनुभव होता... त्या आता बाह्य रूपापेक्षा आंतरिक स्वास्थ्याला जास्त महत्त्व देतात' असं मॉम्सप्रेसोच्या मुख्य संपादक पारुल ओहरी यांनी म्हटलंय.