मुंबई : नरेंद्र मोदी सोमवारी चार देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. हा त्यांचा नेहमीसारखाच दौरा... पण या दौऱ्याच्या निमित्तानं एक चांगली सुरुवात झालीय.
तसं पाहता पंतप्रधानांचा हा नेहमीसारखा परदेश दौरा... त्यासाठी पंतप्रधानांचा ताफा एअरपोर्टला पोहोचतो... पंतप्रधानांना एअरपोर्टला निरोप दिला जातो... हे दृश्यं नेहमीच दिसतं... पण यावेळी मात्र या दृश्यांमध्ये एक वेगळेपण दिसलं. स्त्रीशक्तीचा हा आर्मड फोर्सेसमधला नवा आविष्कार यानिमित्तानं पाहायला मिळाला.
पहिल्यांदाच पंतप्रधानांसाठीच्या एसपीजी अर्थात 'स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप'मध्ये महिलेचा समावेश करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी चार देशांच्या दौऱ्यासाठी सोमवारी जर्मनीला रवाना झाले. त्यावेळी त्यांना एअरपोर्टवर सोडण्यासाठी जो ताफा गेला, त्या एसपीजी टीममध्ये पहिल्यांदाच ही महिला दिसली. काळ्या सफारीत काळ्या गॉगलमध्ये ही एसपीजी महिला अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.
एसपीजी म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप.... देशातल्या व्हीव्हीआयपींना ही सुरक्षा दिली जाते. देशाचे पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना अशा प्रकारची सुरक्षा पुरवण्यात येते. पंतप्रधानांच्या भोवती सुरक्षेसाठी अनेक कडी असतात.... त्यातलं सगळ्यात आतलं कडं हे एसपीजी कमांडोंचं असतं.....एसपीजी कमांडोज हे लष्कराचे अधिकारी असतात.
एसपीजी कमांडोज अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असतात... त्यांच्याकडे बेल्जियम बनावटीची नाटो कॅलिबर रायफल असते. साडे तीन किलोची ही रायफल दर मिनिटाला ८५० राऊण्डस फायर करु शकते आणि अर्ध्या किलोमीटरच्या आतलं लक्ष्य टिपू शकते.
एसपीजी कमांडोजबरोबर FN Five-Seven semiautomatic pistol असतं.... ५० मीटरच्या टप्प्यात हे पिस्तूल लक्ष्य टिपू शकतं. त्यांचे गॉगल्सही विशेष बनावटीचे असतात... हे गॉगल्स तुटू शकत नाहीत. ऊन, वारा, पाऊस आणि इतर कुठल्याही हल्ल्यामध्ये या गॉगल्सना इजा होत नाही.... डोळ्यात कुसळही जाणार नाही, अशा पद्धतीचे हे गॉगल्स असतात.
या एसपीजी कमांडोंच्या सूटसच्या आतमध्ये बुलेटप्रुफ जॅकेट असतं. 10 मीटरच्या आतमधून मारा केल्यावर एके ४७ रायफलच्या गोळ्याही काही बिघडवू शकणार नाहीत, अशा प्रकारचं हे बुलेटप्रुफ जॅकेट असतं.
गुडघ्यावर बांधण्याची नीकॅप आणि कोपराला बांधायचं एलबो पॅड तसंच न घसरणारे आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करू शकतील, असे बूट या कमांडोजसाठी डिझाईन केलेले असतात.
कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये पंतप्रधानांना वाचवणं आणि त्यांना सुरक्षित स्थळी नेणं ही प्रामुख्यानं या एसपीजी कमांडोंची जबाबदारी असते... अशा कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्यांच्या सूटमध्ये दोन रिव्हॉल्वर असतात... त्यांच्या सूटची बटणं विरुद्ध बाजूला असतात, त्यामुळे सूटमधून रिव्हॉल्वर काढणं सोपं जातं. ही रिव्हॉल्वर कायम भरलेली असतात. हे सगळे एसपीजी कमांडोज शार्प सूटर्स असतात. समोरच्याला तीन सेकंदांमध्ये शूट करण्याचं प्रशिक्षण त्यांना दिलेलं असतं.... त्यांनी गोळी मारली की समोरचा माणूस थेट यमसदनीच पोहोचतो.... मार्शल आर्टसचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं असतं.... आणि एका फाईटमध्ये शत्रू कोसळून पडेल, एवढी ताकद त्यांच्या हातात असते. सलग आठवडाभर जागं राहू शकतील, अशा पद्धतीनं या एसपीजी कमांडोजना प्रशिक्षण दिलेलं असतं.
अशा पद्धतीच्या खडतर प्रशिक्षणातून प्रत्येक एसपीजी कमांडोला जावं लागतं... आता महिलांचाही एसपीजी कमांडोजमध्ये समावेश करण्यात आलाय. मोदींच्या ताफ्यात दिसणा-या या महिला कमांडोनंही अशाच प्रकारचं आव्हानात्मक प्रशिक्षण पार केलंय. गेल्या काही काळामध्ये लष्करातही ही स्त्रीशक्ती नवनव्या भराऱ्या घेताना दिसतेय.
आता एसपीजी महिला कमांडोच्या रुपानं नवा इतिहास रचला गेलाय... आणि आणखी एका आव्हानात्मक क्षेत्रात ती पाय रोवून घट्ट उभी राहू शकते, हे तिनं दाखवून दिलंय.