Mango on EMI: आता आंबाही EMI वर विकत घेता येणार! पुण्यात सुरु झाली विक्री

Mango On EMI: उन्हाळ्यामध्ये आंबा खावासा वाटला तरी त्याचे दर बघून अनेकदा मनाला आवर घालावी लागते. मात्र आता पुणेकरांना असं करावं लागणार नाही कारण शहरामध्ये थेट EMI वर आंबे उपलब्ध झाले आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 5, 2023, 12:30 PM IST
Mango on EMI: आता आंबाही EMI वर विकत घेता येणार! पुण्यात सुरु झाली विक्री title=
Mango on EMI (File Photo, PTI)

Mango On EMI: उन्हाळा म्हटल्यानंतर सर्वात आधी डोक्यात येणारी गोष्ट म्हणजे प्रचंड गरमी आणि त्या उलट दुसऱ्या बाजूला जीभेला अल्हाददायक वाटणारा आंबा. उन्हाळा हा अंब्याचा सिझन म्हणून ओळखला जातो. दरवर्षी या फळांच्या राजावर ताव मारण्यासाठी अनेकजण उन्हाळ्याची आणि पर्यायाने आंब्याच्या सिझनची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र ठराविक काळासाठी येणाऱ्या आंब्याच्या किंमती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या नसतात. त्यामुळेच पुण्यातील एका आंबे विक्रेत्याने चक्क ईएमआयवर आंबे विक्री करण्याचा भन्नाट शक्कल वापरली आहे. आपण ईएमआयवर आंबे उपलब्ध करुन दिले तर पुणेकर नक्कीच ते घेतील असा विश्वास या आंबेविक्रेत्याला असून त्याला विश्वास काही पुणेकरांनी सार्थही ठरवला आहे.

कोण विकतंय ईएमआयवर आंबा?

आतापर्यंत तुम्ही ईएमआयवर लॅपटॉप, मोबाईल, दुचाकी, कार यासारख्या गोष्टी विकत घेणाऱ्या लोकांबद्दल ऐकलं असेल किंवा तुम्ही स्वत:ही अशाप्रकारे वस्तू खरेदी केल्या असतील. मात्र आता ईएमआयवर थेट आंबे विकत घेता येणार आहेत. पुण्यात अशाप्रकारे आंबाविक्री सुरु झाली आहे. ईएमआयवर आंबे विकणाऱ्या पुणेकर व्यापाऱ्याचं नाव आहे गौरव सनस. गौर यांचे मागील 12 वर्षांपासून आंब्याचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडे नैसर्गिकरित्या पिकवला जाणारा देवगड हापूस आंबा मिळतो. यंदाच्या वर्षीपासून हा आंबा त्यांनी थेट ईएमआयवर विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला आहे. त्यांनी तशाप्रकारची जाहिरात केली असून या सोयीसाठी त्यांनी पेटीएमशी करार केला आहे.

दोन ग्राहकांनी घेतले EMI वर आंबे

सनस यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत त्यांच्याकडून 30 हजार रुपये किंमतीचे आंबे 2 वेगवेगळ्या ग्राहकांनी विकत घेतले आहेत. एका वर्षासाठी या ग्राहकांना 2500 रुपयांचा हप्ता पडेल, असंही सनस यांनी सांगितलं. अगदी कोणत्याही दरातील आंबे सनस हे ईएमआयवर विकतात. छोट्यात छोट्या हफ्ता असला तरी ईएमआयचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करुन दिला जातो.

कशी सुचली ही कल्पना?

ईएमआयवर आंबेविक्री सुरु करण्यामागील नेमकं कारण काय आहे याबद्दलही सनस यांनी सविस्तर माहिती दिली. सामान्यपणे कोणतीही महागडी वस्तू लोक हल्ली ईएमआयवर विकत घेतात. हाच ट्रेण्ड हेरुन सनस यांनी ईएमआयवर थेट आंबेविक्री सुरु केली. "ईएमआयवर मोबाईल पासून अगदी महागड्या वस्तू सहजासहजी घेणारे अनेकजण आहेत. याचप्रमाणे जर आपण आंबाही ईएमआयवर उपलब्ध करुन दिला तर लोक तो ही घेतील असं मला वाटलं. म्हणजेच एखाद्याने 5 हजारांची आंब्याची पेटी घेतली तर 8 ते 12 महिन्यांच्या ईएमआयमध्ये त्याला पैसे परत करता येईल," असं सनस म्हणाले. सनस यांनी उपलब्ध करुन दिलेली सोय ही आंबाप्रेमी पुणेकरांच्या नक्कीच फायद्याची आहे. सध्या प्रसारमाध्यमांमधील बातम्यांमुळे पुण्यातील या ईएमआयवर आंबे विकणाऱ्या दुकानाची पुण्याच चांगली चर्चा असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.