Coronavirus Updates : कोरोनाचा धोका वाढला, सातारा जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती

Coronavirus Updates : राज्यात कोरोना विषाणूचा उद्रेक पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. आता साताऱ्यात कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे साताऱ्यात सर्व शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयांमध्ये मास्क वापरण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 4, 2023, 09:33 AM IST
Coronavirus Updates : कोरोनाचा धोका वाढला, सातारा जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती title=

Coronavirus Updates : कोरोनाचा धोका दिवसागणिक पुन्हा वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांत कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. आता सातारा येथे सार्वजनिक ठिकाणी मास्क घालने अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी याचे आदेश काढले आहेत. सातारा जिल्ह्यात सीजनल इन्फ्लुएंजा आणि कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी एक परिपत्रक काढून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आदेश दिले आहेत. 

कार्यालये, शाळा-महाविद्यालयांमध्ये मास्क वापरण्याचे आदेश

साताऱ्यात सर्व शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयांमध्ये मास्क वापरण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. राज्यात वाढत असलेल्या सिझनल इन्फ्लुएन्झा आजार आणि कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वतयारी आणि उपायोजना राबवण्याविषयी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हे आदेश दिले. या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये यामधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 

तसेच गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी आठवडा बाजार, एसटी स्टॅंड परिसर, यात्रा, मेळावे, लग्नसमारंभ, मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येण्याची ठिकाणे या सर्व ठिकाणी सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे. सातारा जिल्ह्यात देखील कोरोना बधितांच आकडा वाढत चालला आहे सध्या जिल्ह्यात 53 कोरोना रुग्ण असून यातील दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोणताही धोका अधिक पोहोचू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे.

राज्यात 13 आणि 14 एप्रिल रोजी करोनासाठी मॉकड्रिल

कोरोनाचा धोका वाढल्याने राज्य सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यात 13 आणि 14 एप्रिल रोजी करोनासाठी मॉकड्रिल घेतले जाणार आहे. संपूर्ण राज्यात कोविड आढावा घेतला जाणार आहे. राज्यात सर्वेक्षण आणि परिक्षण सुरु आहे. काळजी करण्याचे कारण नाही. मात्र ताप, खोकला, सर्दी अंगावर काढू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घ्या. कोरोना असेल तरी 48 ते 72 तासात रुग्ण बरा होतो, असे आरोग्यमंत्र्यांनी यांनी म्हटले आहे.

कोरोनाचा धोका वाढला आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मास्क वापरण्याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत   यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. तसेच राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर 1.82 टक्के आहे. राज्यात एकूण 3532 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण सर्वाधिक आहे. यात पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा कोल्हापूर या सहा जिल्ह्यांचा समावेश असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.