Kasba Results: पत्नीला CM करा सांगणाऱ्या बिचुकलेला किती मतं पडली पाहिलं का? दवेंनाही NOTA पेक्षा कमी मतं

Kasba Bypoll Election Results: कसब्यामध्ये मुख्य लढत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार विरुद्ध भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारामध्ये होती तरीही या मतदारसंघातून काही खास कायम चर्चेत राहणारे काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

Updated: Mar 2, 2023, 04:01 PM IST
Kasba Results: पत्नीला CM करा सांगणाऱ्या बिचुकलेला किती मतं पडली पाहिलं का? दवेंनाही NOTA पेक्षा कमी मतं title=
abhijit bichukale Anand dave

Kasba Bypoll Election Results: कसबा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हेमंत रासने यांचा 10 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. या मतदारसंघातील निवडणूक फारच चुरशीची झाली. भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र धंगेकरांच्या बाजूने कसब्यातील मतदारांनी कौल दिला. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवरील या पोटनिवडणुकीमध्ये या दोन प्रमुख उमेदवारांबरोबरच बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेही (Abhijit Bichukale) उभा राहिला होता. या निवडणुकीमध्ये अभिजित बिचुकलेला किती मतं पडलं याबद्दल पुणेकरांमध्ये उत्सुकता आहे. कसब्यातील मतमोजणी पूर्ण झाली असून बिचुकलेला किती मतं पडली यासंदर्भातील आकडेवारी समोर आली आहे.

बिचुकलेला किती मतं?

अभिजित बिचुकलेने कसब्यामधून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरुन निवडणूक लढवली होती. मागील आठवड्यामध्ये झालेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचे प्रश्न हे प्रचारापेक्षा अधिक महत्त्वाचे वाटतात असं म्हणत विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला होता. तसेच यावेळेस बिचुकलेंनी माझ्या पत्नीला मुख्यमंत्री केल्यास राज्यातील सर्व प्रश्न सुटतील असंही विधान केलं होतं. बिचुकलेंनी पत्नीला मुख्यमंत्री करण्याच्या विधानावरुन चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र आज लागलेल्या निकालांमध्ये बिचुकलेंचा कसब्यामधील निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. बिचुकेला या निवडणुकीमध्ये केवळ 47 मतं मिळाली आहेत.

आनंद दवेंही अपयशी

याचप्रमाणे ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंनाही (Anand Dave) मतांच्या बाबतीत 300 चा टप्पांही ओलांडता आला नाही. ब्राह्मण उमेदवाराच्या मुद्द्यावरुन चर्चेत असलेल्या या मतदारसंघामध्ये दवेंना केवळ 296 मतं मिळाली आहे. विशेष म्हणजे कायम आपल्या प्रतिक्रियांमुळे चर्चेत असणाऱ्या या दोन उमेदवारांची मतं एकत्रित केली तरी त्याहून चौपट अधिक मतं नोटाला मिळाली आहेत. कसब्यातील 1397 मतदारांनी कोणताही उमेदवार योग्य नसल्याचं दर्शवणारा नोटा हा पर्याय निवडला आहे. 

10 हजारांहून अधिक मतांनी विजयी

कसब्यामध्ये 10 हजार 950 मतांनी धंगेकरांनी विजय मिळवला आहे. या विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना आज कसब्यामध्ये पैशांचा नाही मतांचा पाऊस पडला असं धंगेकर म्हणाले आहेत. मी गिरीश बापटांची भेट घेण्यासाठी नक्की जाणार असल्याचंही धंगेकरांनी नमूद केलं. तसेच हा विजय सुरुवात असून महाराष्ट्रभरामध्ये परिवर्तन होईल असंही धंगेकर यांनी म्हटलं आहे. याशिवाय भाजपाचे पराभूत उमेदवार हेमंत रासने यांनीही पराभव स्वीकारला आहे. पराभवानंतर रासने यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली. "उमेदवार म्हणून मी कमी पडलो आहे. पक्षाने मला संधी दिलेली मात्र मीच कमी पडलो. हा पराभव मला मान्य असून या पराभवाची कारणं शोधणार आहोत," असं रासने यांनी म्हटलं आहे.