'पवारांनी सोयीची भूमिका मांडू नये, अन्यथा पोलिसांचे मनोबल खच्ची होईल'

तुमच्या काळात झालेले निर्णय योग्य आणि आमच्या काळातील निर्णय जातीयवादी

Updated: Dec 23, 2019, 07:20 PM IST
'पवारांनी सोयीची भूमिका मांडू नये, अन्यथा पोलिसांचे मनोबल खच्ची होईल' title=

पुणे: कोरेगाव-भीमा प्रकरणात शरद पवार यांनी सोयीची भूमिका घेऊ नये. त्यामुळे राज्यातील पोलिसांचे मनोबल खच्ची होईल, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते सोमवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, कोरेगाव-भीमा संदर्भात शरद पवारांनी केलेली वक्तव्ये ऐकून मला आश्चर्य वाटले. याप्रकरणात अटक झालेल्या सुधीर ढवळे, अरब फरेरा यांना आघाडीचे सरकार असतानाही अटक झाली होती. त्यावेळी गृहमंत्रीही राष्ट्रवादी काँग्रेसचा होता. केंद्रातील मनमोहन सिंग यांच्या सरकारनेही त्यावेळी माओवादी संघटनांच्या यादीत कबीर कला मंचाचे नाव नमूद केले होते. मग त्यांच्या काळात झालेले निर्णय योग्य आणि आमच्या काळात या सगळ्यांना अटक झाली तर तो जातीयवाद कसा ठरू शकतो? शरद पवारांच्या या सोयीच्या भूमिकेमुळे राज्यातील पोलिसांचे खच्चीकरण होऊ शकते, अशी भीती देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 

पंतप्रधान मोदींचे ते विधान धक्कादायक - शरद पवार

शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणातील पुणे पोलिसांच्या कारवाईविषयी शंका उपस्थित केली होती. या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली होती. नक्षलवादाशी संबंधित पुस्तक घरात सापडले, म्हणजे तो गुन्हा ठरत नाही. माझ्याही घरात नक्षलवादाचे पुस्तक आहे. आम्हीही माहिती घेतो म्हणजे लगेच तो गुन्हा ठरत नाही, असे पवारांनी म्हटले होते. 

तत्पूर्वी आज झारखंडमधील विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपला टोले लगावले. झारखंडच्या जनतेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला, हे अभिनंदनीय आहे. देशात अशीच परिस्थिती राहिली तर संधी मिळेल तेव्हा देशातील जनताही झारखंडप्रमाणेच निर्णय घेईल, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.