पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले

पुण्यातील कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५० हजारावर पोहोचली आहे. 

Updated: Jul 30, 2020, 09:23 AM IST
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले title=

किरण ताजणे, झी मीडिया, मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र असलेल्या पुणेकरांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्यात बुधवारी प्रथमच कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक भरली. काल पुणे जिल्ह्यातील कोरोनावर यशस्वीपणे मात केलेल्या एकूण ३,३७६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. पुण्यात एकाच दिवसात इतक्या मोठ्याप्रमाणावर कोरोना रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच घटना आहे. पुण्याच्यादृष्टीने ही अत्यंत दिलासादायक बाब मानली जात आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पुणे दौऱ्यावर यायची कारणं काय?

त्यामुळे आता पुण्यातील कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५० हजारावर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ७८०१३ इतका आहे. बुधवारी पुणे महानगरपालिका क्षेत्रात १,४५८ नवे रुग्ण आढळले. मुंबईपेक्षा पुण्यातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या जास्त असल्याने सध्या चिंतेचे वातावरण आहे. पुण्यात १५ ऑगस्टपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. पुढच्या २ आठवड्यात किमान २ हजार आयसीयू आणि १ हजार व्हॅन्टिलेटरची आवश्यकता भासणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुण्याचा दौरा करणार आहेत. पुण्यातली कोरोना परिस्थिती, त्यावरून रंगलेलं राजकारण, भाजपने यासंदर्भात केलेले आरोप, हे सगळं पाहता मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे

मुंबईत कोरोनाची साथ आटोक्यात- इकबाल चहल

.बुधवारी राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ९,२१९ने वाढली आहे. तर २९८ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातला कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ४ लाखांच्या पलीकडे गेला आहे. सध्या राज्यातला मृत्यूदर हा ३.६१ टक्के एवढा आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५९.८४ टक्के एवढं आहे.