पुणे होर्डिंग अपघात | जखमी रिक्षा चालकाच्या पत्नीने अखेर मदत नाकारली

नुकसान भरपाईसाठी कायदेशीर लढा द्यायचा ठरवला आहे. 

Updated: Oct 8, 2018, 10:39 PM IST
पुणे होर्डिंग अपघात | जखमी रिक्षा चालकाच्या पत्नीने अखेर मदत नाकारली title=

पुणे: काही दिवसांपूर्वी पुण्यात होर्डिंगचा सांगाडा रस्त्यावर कोसळून भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत चार जणांना प्राण गमवावे लागले होते. तर अनेकजण गंभीररित्या जखमी झाले होते. याच जखमींपैकी एक असणारे उमेश मोरे यांच्या पत्नीने रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली तुटपुंजी रक्कम नाकारली आहे. 

रिक्षाचालक असणारे उमेश मोरे घरात एकटेच कमावते आहेत. त्यांच्यावर पत्नी, तीन लहान मुली आणि वृद्ध आई-वडील अशा सगळ्यांची जबाबदारी आहे. या दुर्घटनेत त्यांच्या मेंदुला जबर दुखापत झाली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना घरी सोडण्यात येईल, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे त्यांना पुन्हा रिक्षा चालवता येण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. 

अशा परिस्थितीत रेल्वेने आम्हाला केवळ एक लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. हे पैसे उमेश यांच्या उपचारासाठीही पुरणार नाहीत. त्यामुळे सुवर्णा मोरे यांनी ही मदत नाकारून अधिकच्या नुकसान भरपाईसाठी कायदेशीर लढा द्यायचा ठरवला आहे. 

तर दुसरीकडे यानंतर रेल्वे प्रशासनाचा उद्दामपणा समोर आला आहे. जखमींना पंधरा हजार रुपये देण्याचा नियम असताना मोरेंना एक लाख रुपये देत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याबद्दल रेल्वेच्या कार्यालयात जाब विचारायला गेल्यावर जखमींच्या नातेवाईकांना गेटवरच पोलिसांकडून अडवले जात आहे. त्यामुळे आधी बेजबाबदारपणा करायचा आणि नंतर धड मदतही करायची नाही, असा रेल्वेचा कारभार असल्याचा आरोप जखमींच्या कुटुंबीयांनी केला आहे.