पेस्ट कंट्रोलमुळे कुटुंबाला विषबाधा; मुलाचा मृत्यू

घटना घडली त्या दिवशी घरातून निघण्यापूर्वी त्यांनी स्वत:च्या घरात पेस्ट कंट्रोल केले होते. 

Updated: Sep 27, 2018, 11:30 PM IST
पेस्ट कंट्रोलमुळे कुटुंबाला विषबाधा; मुलाचा मृत्यू title=

पुणे: पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. यात एका नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील आनंद नगरमध्ये रविवारी रात्री ही घटना घडली. संदीप डोंगरे आपल्या पत्नी व मुलांसोबत गणेश विसर्जन मिरवणूक पाहायला गेले होते. रात्री घरी परतल्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास सुरु झाला. सगळ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

मात्र, सार्थक या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर तिघांवर उपचार सुरु आहेत. हा विषबाधेचा प्रकार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु, ही विषबाधा नेमकी कशातून झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. 

संदीप डोंगरे हे पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय करतात. घटना घडली त्या दिवशी घरातून निघण्यापूर्वी त्यांनी स्वत:च्या घरात पेस्ट कंट्रोल केले होते. घरी परतल्यावर त्याचाच त्रास होऊन सगळ्यांना विषबाधा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.