Ganesh Chaturthi 2022: दोन वर्षांच्या कोरोना महासंकटातील नियमानंतर पहिल्यांदाच मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने गणरायाचं देशभरात आगमन होतं आहे. गणेशभक्तांमध्ये उत्साह ओसडूंन वाहत आहे. घरोघरी बाप्पाचं वाजतगाजत स्वागत करण्यात येतं आहे. zee24taas वर तुम्हाला घरबसल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या श्रीगणेशाचं दर्शन घडवणार आहोत. नवसाला पावणारा गणपती म्हणून नागपुरातील बाप्पाची ख्याती आहे. नागपूरचं नव्हे तर विदर्भ आणि मध्य भारतातील नागरिकांच्या आस्थेचं श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणेश मंदिरात भाविकांची मांदियाळी आपल्याला वर्षभर बघायला मिळते. (ganesh chaturthi 2022 know about nagpur tekdi ganesh mandir trending news)
नागपुरातील प्राचीन टेकडी गणेश मंदिर या ठिकाणी असलेल्या गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे. पूर्वीच्या काळी भोसले राजघराण्यातील मंडळी दररोज दर्शनाला या मंदिरात येत होते. टेकडी गणपती मंदिर हे भोसलेकालीन मंदिर असून येथील गणेश मूर्ती साडेतीनशे वर्षे जुनी असल्याचा अंदाज आहे. या मंदिराचं एक खास वैशिष्ट्यं म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली असेलील मूर्ती. विदर्भातील अष्टविनायकांमध्ये क्रमांक एकचा मान मिळतो तो याच गणपतीला.
इंग्रजांची सत्ता असताना राजे भोसले आणि इंग्रजांची लढाई ही सीताबर्डी परिसरातील टेकडीवर झाली होती, असा इतिहास सांगितला जातो. त्याच टेकडीवर हे गणेश मंदिर आहे. त्या काळी शुक्रवारी तलावाचे पाणी टेकडी मंदिरापर्यंत येत असल्याने भोसले राजे नावेतून गणेश मंदिरात दर्शनासाठी येत असल्याचं बोललं जातं होतं. सुरुवातीच्या काळात हे विनायकाचं मंदिर अगदी छोटासं होतं. त्यानंतर हळूहळू टेकडी गणेश मंदिराचा विकास झाला. या मंदिरातील बाप्पाची मूर्ती उत्तराभिमुख आहे, तर मूर्ती उजव्या सोंडेची आहे. गणपती मूर्तीच्या मागच्या भिंतीजवळ एक शिवलिंग आहे. बापाच्या मूर्तीची उंची साडेचार फूट तर रुंदी तीन फूट आहे.
#WATCH | Maharashtra: Morning aarti performed and prayers offered at Shree Ganesh Mandir Tekdi in Nagpur, on the occasion of #GaneshChaturthi2022 pic.twitter.com/J79MCkNTkM
— ANI (@ANI) August 31, 2022
असं म्हणतात की नागपूरचा टेकडी चा गणपती हा नवसाला पावणारा गणपती आहे, त्यामुळेच येथे नागपूरातूनच नव्हे तर संपूर्ण विदर्भातून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात..इतकंच नव्हे तर मोठे मोठे राजकारणी, क्रिकेटपटू सुद्धा टेकडीच्या गणपतीला दर्शनासाठी येत असतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ज्यावेळी नागपुरात क्रिकेट सामन्यांसाठी यायचा तेव्हा तो हमखास तो सामन्यापूर्वी याच टेकडीच्या गणपतीला दर्शनासाठी येत असे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)