विशाल वैद्य, झी मीडिया, ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) ठाण्यात (Thane) पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या (Thackeray Group) महिला पदाधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे. ठाण्यातील कळवा येथील मनीषा नगर जयभीम नगर येथे अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे येणार असल्याचे भासवून शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ (ayodhya poul) यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र कार्यक्रमावेळी अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक करत त्यांना मारहाण करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
कळव्याच्या मनिषा नगर भागात अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. ठाकरे गटाचा कार्यक्रम म्हणून अयोध्या पोळ यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र कार्यक्रमस्थळी पोहचल्यानंतर हा पक्षाचा कार्यक्रम नसल्याचे पोळ यांच्या लक्षात आले. त्यावेळी पोळ यांना कार्यक्रम सुरु करण्यास सांगितले. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक महिला होत्या. यावेळी सर्व महापुरुषांच्या फोटोला हार घालत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला शेवटी हार का घातला असे म्हणून स्थानिक महिलांनी पोळ यांच्यावर प्रथम शाई फेकली आणि नंतर मारहाण केली.
यानंतर पोळ यांनी त्या ठिकाणावरून थेट कळवा पोलीस ठाणे गाठले. कळवा पोलीस ठाण्यामध्ये अयोध्या पोळ तक्रार नोंदवून परतत असताना त्यांना पुन्हा एकदा पोलीस स्थानकाच्या बाहेरच पोलिसांसमोर महिलांनी मारहाण केली..यामागे नेमकं कोण आहे हे अद्याप समोर आलं नसून पहाटे पर्यंत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कळवा पोलीस ठाण्या बाहेर गर्दी केली होती. या सर्व वादानंतर आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.
अयोध्या पोळ काय म्हणाल्या?
"11 जून रोजी पक्षाचा कार्यक्रम आहे असे मला निमंत्रण देण्यात आले होते. पक्षाचा कार्यक्रम असल्याने मी इथे आले होते. इथे आल्यानंतर मला पाठवलेल्या पोस्टर्सप्रमाणे बॅनर नव्हते. त्यावेळी मला कारणे सांगून कार्यक्रम सुरु करण्यास सांगितले. त्यावरुनच त्यांनी वाद घातला. इथे महापुरुषांचा अपमान झालेला नाही. जर मी महापुरुषांचा अपमान केला असेल तर काय अपमान केला आहे हे त्यांनी मला दाखवून द्यावं. पोलीस ठाण्यातच माझ्यावर काही महिलांनी हल्ला केला. मला गृहमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे की जर एखाद्या महिलेवर पोलीस ठाण्यातच हल्ला होत असेल तर तुम्ही कायदा सुव्यवस्था कोणत्या वेशीला टांगली आहे? ज्यांनी मला कार्यक्रमासाठी बोलवलं होतं त्यांच्याविरोधात मी गुन्हा दाखल केला आहे," असे अयोध्या पोळ यांनी म्हटलं आहे.