NIA Raid : कर्नाटकसह राज्यातील काही भागांमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने शनिवारी पहाटे धाडी टाकल्या आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील 44 ठिकाणी एनआयएकडून छापेमारी करण्यात आले आहे. कर्नाटमध्ये 1, तर महाराष्ट्रात 43 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पुणे 2, ठाणे ग्रामीण 31, ठाणे शहर 1 आणि भाईंदरमधील एका ठिकाणाचा समावेश आहे. याप्रकरणी एनआयएने 15 जणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ठाणे जिल्ह्यात पकडलेल्या आरोपींकडे मोठ्या प्रमाणात रोकड आणि हत्यारे सापडली आहेत.
या छाप्यांदरम्यान, एनआयएने दहशतवाद्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि आयएसआयएस हँडलर्सच्या सहभागासह मोठ्या कटाचा पर्दाफाश केला आहे. एनआयएच्या तपासात भारतामध्ये आयएसआयएसच्या दहशतवादी विचारसरणीचा प्रचार करणाऱ्या लोकांचे एक नेटवर्क उघड झाले आहे. भारतात दहशतवाद आणि हिंसाचार पसरवण्याच्या दहशतवादी संघटनेच्या योजना हाणून पाडण्यासाठी एनआयए तपास करत आहे. यापूर्वीही असे छापे टाकण्यात आले असून त्यात अनेक संशयितांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने शनिवारी अटक केलेल्या आरोपींकडून 1 पिस्तूल, 2 एअर गन, 8 तलवारी, दोन लॅपटॉप, 6 हार्ड डिस्क, 3 सीडी, 38 मोबाईल फोन, 10 पुस्तके, 68,03,800 रोख रक्कम आणि 51 हमासचे झेंडे जप्त केले आहेत. या कारवाईमुळे मोठा कट शिजत असल्याचे पुन्हा एकदा समोर आलं आहे.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 15 दहशतवाद्यांमध्ये साकिब अब्दुल हमीद नाचन उर्फ रवीश उर्फ साकिब उर्फ खालिद आणि त्याचे साथीदार हसीब जुबेर मुल्ला, कासिफ अब्दुल सत्तार, सैफ अतीक नाचन, रेहान अशफाक, सगफ सफिक दिवाकर, फिरोज दस्तगाईर कुवारी, आदिल मुसैल, आदिल इ. हसीब मुल्ला, रफील अब्दुल लतीफ नाचन, याह्या रवीश खोत, राजील अब्दुल लतीफ नाचन, फरहान अन्सार, मुकशील मकबूल नाचन आणि मुंजीर अबुबकर यांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेले सर्व दहशतवादी महाराष्ट्रातील ठाणे येथील रहिवासी आहेत.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने आदिल खोत यांच्याकडून हमासचे ध्वज आणि फिरोज दस्तगीर, राजील नाचन, झीशान इजाज मुल्ला आणि मुकशील मकबूल यांच्याकडून शस्त्रे जप्त केली. सैफ अतिक नाचन, रेहान अशफाक आणि आतिफ नसीर यांच्याकडून 68 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. तपास यंत्रणेने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलमध्ये 6 नोव्हेंबर रोजी नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास सुरु केला होता. या प्रकरणी स्पेशल सेलने पुण्यातून फरार तीन दहशतवादी शाहनवाज आलम, मोहम्मद रिजवान अश्रफ आणि मोहम्मद अर्शद वारसी यांना अटक केली होती.
दरम्यान, यापूर्वी इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचा (सिमी) सचिव म्हणून काम केलेला साकिब नाचन अटकेच्या वेळीही दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी साकिबला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर साकीब याची 2017 मध्ये त्याची सुटका झाली होती.