Maharashtra Politics : शिंदे गटाकडून (Shinde Group) जमीनदोस्त करण्यात आलेल्या मुंब्रा (Mumbra) येथील मध्यवर्ती शाखेला भेट देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शनिवारी दुपारी ठाण्यात आले होते. मात्र या शाखेला भेट देण्यापासून पोलिसांनी (Police) रोखले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना माघारी फिरावे लागले. मात्र यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. निवडणुका येऊद्या तुमची मस्ती फाडतो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिला. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखा जमीनदोस्त केल्याच्या कारणावरून ठाकरे आणि शिंदे गटात वाद उफाळून आला आहे. अशात उद्धव ठाकरे हे शनिवारी त्या शाखेला भेट देण्यासाठी आले होते. मात्र पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना शाखेत जाण्यापासून रोखले. मुंब्य्रातील दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधत सरकारवर टीका केली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'पोलिसांचं धन्यवाद मानतो कारण, त्यांनी शाखाचोरांचं रक्षण केलं. प्रशासन हतबल झाल्याचं संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आज येथे काही घडलं असतं, तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती. सत्तेची गादी भोगणाऱ्यांनी आधीच महाराष्ट्राची अब्रू घालवली आहे. खोके सरकारनं आमची शाखा पाडून एक खोका अडवून ठेवला आहे. आमच्या जागेवर अतिक्रमण केलं आहे. तो खोका लवकरात लवकर उचलावा. अन्यथा आम्ही येऊन तो खोका उचलून फेकून देईल. तुमच्यात हिंमत असेल, तर पोलिसांना बाजूला सारून समोर या,' असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं.
मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
"आज फुसके बार मुंब्र्यात येऊन गेले ते वाजले नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि त्यांना युटर्न घेऊन जावं लागलं. आम्ही शिस्तीने तिथे होतो. अर्धी मुंबई ते येतांना सोबत घेऊन आले. दिवाळीमध्ये असे विघ्न आणणे योग्य नाही. काही लोकांना पोटदुखी सुटली आहे. तिथे शिवसेनेची शाखा आम्ही पुन्हा बांधत आहोत. त्याचे काम देखील सुरु केले आहे. जनता आमच्या सोबत आहे, जुन्या शाखेत काही व्यवसाय चालत होते. शाखा हे न्यायाचं मंदिर आहे," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
कोण जितेंद्र आव्हाड? ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोण कुठे आहे ते आम्ही दाखवून दिलंआहे. ते सातव्या नंबरवर गेलेत पुढच्या निवडणुकीत ते दस नंबरी असतील, असाही टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.