मुंबई: व्होल्वो कार इंडिया देशात पहिले इलेक्ट्रिक वाहन लाँच करण्यासाठी सज्ज आहे. नवीन व्होल्वो XC40 रिचार्ज पुढील महिन्यात म्हणजेच जुलै 2022 मध्ये भारतीय बाजारात लाँच होईल, अशी माहिती व्होल्वो इंडियाने ही माहिती दिली आहे. यासोबतच ही गाडी भारतातच असेंबल करणार असल्याचे जाहीर केले आहे. ही कॉम्पॅक्ट लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्ही कर्नाटकातील बेंगळुरूजवळील कंपनीच्या होसाकोटे प्लांटमध्ये असेंबल केली जाईल.
Volvo XC40 रिचार्ज या गाडीचे भारतात मार्च 2021 मध्ये अनावरण करण्यात आले होते. यासाठीचे प्री-बुकिंग गेल्या वर्षी जूनमध्ये सुरू झाले होते. कॉम्पॅक्ट मॉड्यूलर आर्किटेक्चर (CMA) प्लॅटफॉर्मवर तयार केले गेले आहे. यात दोन इलेक्ट्रिक मोटर्स असून 408 Bhp आणि 660 Nm टॉर्क जनरेट करू शकतात. Volvo XC40 रिचार्ज 78kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे.
व्होल्वोचा दावा आहे की, गाडी एका पूर्ण चार्जवर सुमारे 418 किमीची रेंज देऊ शकते. गाडीचं वितरण ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू होईल. कंपनीने सांगितले की व्होल्वो कार इंडिया 2022 पासून दरवर्षी नवीन सर्व-इलेक्ट्रिक मॉडेल सादर करण्याची योजना आखत आहे. 2030 पर्यंत व्हॉल्वो ही पूर्णपणे इलेक्ट्रिक कारचे उत्पादन करणारी कंपनी असेल.
The ultimate safety test is upon us all and step by step we create a future we love by making the right choices. Thank you for loving the Volvo XC40 Recharge Pure Electric and supporting the change. Sign up for a test drive at your nearest dealership.#VolvoIndia #XC40Recharge pic.twitter.com/jiwSIPaLN6
— Volvo Car India (@volvocarsin) June 7, 2022
व्होल्वो कार्स इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक ज्योती मल्होत्रा यांनी सांगितलं की, "आम्ही भारतीय बाजारपेठेत पुढे जाण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि आमच्या बेंगळुरू येथील प्लांटमध्ये XC40 रिचार्ज या गाडीसाठी सज्ज आहोत. एक कंपनी म्हणून आम्ही आधीच सांगितले आहे की आम्ही 2030 पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक कार कंपनी बनू. स्थानिक स्तरावर असेंबल करणं, हे त्या दिशेने एक पाऊल आहे."