Driving Without Sufficient Fuel challan: कार किंवा बाइक घेतल्यानंतर वाहतूक नियम माहिती नसतील, तर मोठा दंड भरावा लागू शकतो. यामुळे वाहतुकीचे नियम माहिती असणं आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, पीयुसी, इंश्युरन्स आणि गाडीची कागदपत्रं जवळ असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वाहन रस्त्यावर चालवताना नियमांचं पाळण करणं अत्यावश्यक आहे. यासाठी दुचाकीवर स्वार दोन्ही व्यक्तींना हेल्मेटचा घालण्याचा नियम आहे. त्याचबरोबर सिग्नल यंत्रणेकडे बारीक नजर असणं आवश्यक आहे. असे नियम असताना एका चलनाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. केरळ वाहतूक पोलिसांनी केलेल्या दंडाची पावती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्यक्तीला 250 रुपयांचा दंड भरावा लागला. पण हा दंड वाहनामध्ये इंधन कमी असल्याने भरावा लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अशा पद्धतीचा दंड पहिल्यांदाच झाल्याचं बोललं जात आहे. पण खरंच असा नियम आहे का? याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे नियम
सोशल मीडियावर केरळमधील एका व्यक्तीने दंडाची पावती पोस्ट केली आहे. या दंडात्मक पावतीमध्ये वाहनामध्ये इंधन कमी असल्याचं कारण सांगण्यात आलं आहे. पण चुकीच्या बाजूने बाइक चालवल्याने दंड केल्याचा दावा त्या व्यक्तीने केला आहे. यासाठी त्याला 250 रुपयांचा दंड भरावा लागला. पण घाईत असल्याने त्याने दंडाची पावती पाहिली नव्हती. त्यानंतर त्याने दंडाची पावती बघितल्यानंतर त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. यानंतर दंडाची पावती चर्चेचा विषय ठरली आहे.
Challan issued in Kerala for
"driving without sufficient fuel" pic.twitter.com/ahtL1G9Mno— ADV Pramod Kumar (@thelawyr) July 28, 2022
वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईची दंडात्मक पावती पहिल्यांदा समोर आली आहे. असं असलं तरी हा वाहतूक नियम खरंच आहे. हो तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे. हा नियम कमर्शियल वाहनांना लागू आहे. या कमर्शियल दुचाकीचाही समावेश आहे. नियमानुसार कोणतंही कमर्शियल वाहन प्रवाशांना घेऊन इंधन भरण्यासाठी थांबतं, तेव्हा वाहतूक पोलीस दंड करू शकतात. म्हणजेच लोकं पॅसेंजरला गाडीत बसवून इंधन किंवा सीएनजी भरतात, त्यांना दंड ठोठावला जातो. पण साधारणपणे पोलीस अशा पद्धतीचा दंड आकारत नाही.