मुंबई : सध्या तरुणाईवर टिक टॉकचं गारुड आहे. या एपने तरुणाईला अक्षरश: वेड लावलं आहे. या एपचा वापर करुन अनेक तरुण-तरुणी रातोरात सेलिब्रेटी झाले आहेत. या एपचं गारुड इतकं झालं की हे बंद करण्यासाठी न्यायालयाला आदेश द्यावे लागले. पण ते अद्यापही प्रत्यक्षात आले नाही. आता टिक टॉक कंपनी पुन्हा तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनण्यास सज्ज झाली आहे. बाइट कंपनी लवकरच आपला नवाकोरा स्मार्टफोन बाजारात आणणार आहे.
बाइट डान्स ही कंपनी आता मोबाईल उत्पादनाच्या क्षेत्रात देखील उतरणार आहे. त्यांच्या नव्या फोनमध्ये टिक टॉक आणि इतर एप प्रीलोडेड असणार आहेत. बाइटडान्सचे सीईओ झांग यिमिंग हे स्वत: मोबाइल निर्मितीच्या क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्नशील होते.
चीनमधील या कंपनीनं मोबाइल निर्मिती करणाऱ्या एका कंपनीशी यावर्षीच करार केल्याचे समोर आले आहे. टिक टॉक एप भारत आणि अमेरिकेत लोकप्रिय आहे. सध्या शाओमी, विवो, वन प्लस, ओप्पो सारख्या चिनी मोबाइल कंपन्यांच्या स्पर्धेत आता टिकटॉक मोबाईलची भर पडणार आहे. आता टीक टॉकच्या एपला डोक्यावर घेतल्यानंतर त्यांच्या मोबाईलला कसा प्रतिसाद मिळतो हे येणाऱ्या काळात कळेलच.