टाटाची जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच, एकदा चार्ज केल्यास ३१२ किमी मायलेज

टाटा कंपनीने (TATA) आपली नवी SUV कार लाँच केली आहे.  

Updated: Jan 28, 2020, 07:51 PM IST
टाटाची जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच, एकदा चार्ज केल्यास ३१२ किमी मायलेज title=

मुंबई : टाटा कंपनीने (TATA) आपली नवी SUV कार लाँच केली आहे. लाँचिंगवेळी खुद्द उद्योगपती रतन टाटा हेही उपस्थित होते. टाटा मोटर्सने नेक्सॉन (Nexon EV)ही कॉम्पॅक्ट श्रेणीतील नवी कार आज मंगळवारी लाँच केली. ही इलेक्ट्रिक कार आहे. TATA ची देशातील ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असून ती एकदा चार्ज केली तर ३१२ किलो मीटर अंतर कापू शकणार आहे. त्यामुळे या कारला लोकांची अधिक पसंती पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. Tata Nexon EV या कंपनीची पहिलीच इलेक्ट्रिक एसयूव्ही कार (SUV) असून यामध्ये नवीन झिपट्रॉन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

Tata Nexon Electric कार या तीन प्रकारांत उपलब्ध आहेत. यात XM, XZ+ आणि XZ+ LUX, असे मॉडेल असणार आहे. ही आकर्ष कार बाजारात उतरवण्यात आल्यानंतर तिला लोकांची चांगली पसंती मिळेल, असा दावा करण्यात आला आहे. Tata Tigor या कारनंतर नेक्सॉन ही टाटाची दुसरी इलेक्ट्रिक आणि पहिली एसयुव्ही कार आहे. याशिवाय देशातील आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयुव्ही असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. 

टाटा नेक्सॉन ईव्हीच्या बेसिक व्हेरिअंट XM मध्ये फुल ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, दोन ड्राइव्ह मोड, की-लेस एंट्री आणि पुश बटण स्टार्ट, ZConnect कनेक्टेड कार अ‍ॅप, फ्रंट-रिअर पावर विंडो आणि इलेक्ट्रिक टेलगेट यांसारखे फीचर्स देण्यात आले आहे. तर XZ+ व्हेरिअंटमध्ये दोन रंगाचे पर्याय, १६-इंच डायमंड-कट अ‍ॅलॉय व्हिल्स, ७-इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, रिअर कॅमेरा आणि लेदर फिनिश स्टिअरिंग व्हिल आहेत.

नवी नेक्सॉन ZConnect अ‍ॅप्लिकेशनसह आली असून या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनमध्ये ३५ अ‍ॅडव्हान्स कनेक्टेड कार फीचर्स मिळतील असे कंपनीने म्हटले आहे. यात एसयुव्हेचे स्टॅटिस्टिक्स, रिमोट अ‍ॅक्सेस, सुरक्षिततेच्या फीचर्सचा समावेश आहे.

कारचे खास वैशिष्ट्य 

या इलेक्ट्रिक एसयुव्हीमध्ये प्रोजेक्टर लाइट्स, शार्प हेडलँम्प्स आणि एलईडी डीआरएल आहेत. कारमध्ये रुंद एअरडॅम, क्रोम बेझल्ससह फॉग लॅम्प, नवे अ‍ॅलॉय व्हिल्स आणि टर्न इंडिकेटर्ससोबत आउट साइड रिअर व्ह्यू मिरर्स देण्यात आला आहे.

Nexon EV मध्ये ३०.२ kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. यामधील इलेक्ट्रिक मोटर १२९ ps ची ऊर्जा आणि २४५Nm पीक टॉर्क निर्माण करते. सिग्नेचर टील ब्लू, ग्लेशिअर व्हाइट आणि मूनलाइट सिल्वर या तीन रंगांमध्ये ही इलेक्ट्रिक एसयुव्ही उपलब्ध आहे.

भारतीय बाजारात या गाडीची टक्कर एमजी मोटर्सच्या ZS EV आणि ह्युंदाईच्या कोना इलेक्ट्रिक एसयुव्ही या गाड्यांसोबत असेल. ही कार एकदा पूर्ण चार्ज केली तर ३१२ कि.मी. पर्यंतचं अंतर पार करू शकेल, असा कंपनीचा दावा आहे. स्टँडर्ड १५ A AC चार्जरद्वारे बॅटरी २० टक्के ते १०० टक्के चार्ज करण्यासाठी आठ तासांचा वेळ लागेल. तर, फास्ट चार्जरद्वारे बॅटरी ६० मिनिटांत ० ते ८० टक्के चार्ज होऊ शकते.

काय आहे कारची किंमत?

टाटा कंपनीने देशभरात इलेक्ट्रिक नेक्सॉनची एकच एक्स शोरूम किंमत ठेवली आहे. इलेक्ट्रिक नेक्सॉनच्या टॉप व्हेरिअंट XZ+ LUX मध्ये सनरूफ, प्रीमियम लेदर फिनिश सीट्स आणि ऑटोमॅटिक रेन सेंन्सिंग वायपर्स आणि ऑटोमॅटिक हेडलँम्प्स आहेत. नेक्सॉन ईव्हीच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत १३.९९ लाख, XZ+ ची 1१४.९९ लाख रुपये आणि टॉप व्हेरिअंट XZ+ LUX ची किंमत १५.९९ लाख रुपये आहे.