iPhone वर उमटणार 'टाटा'चा शिक्का; लवकरच भारतात तयार होणार आयफोन?

TATA First Iphone Manufacture in India: लवकरच भारतात आयफोनची निर्मिती होणे शक्य होणार आहे. भारतातील अग्रगण्य टाटा समूहाकडून तसे प्रयत्न केले जात आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 11, 2023, 05:36 PM IST
iPhone वर उमटणार 'टाटा'चा शिक्का; लवकरच भारतात तयार होणार आयफोन? title=
Tata Group set to become 1st Indian iPhone maker says report

Tata iPhone: जगभरात अॅपल (Apple) कंपनीच्या आयफोनची क्रेझ वाढत आहे. आयफोन (iPhone) किंवा अॅपलचे कोणतेही प्रोडक्ट बाजारात लाँच होताच त्याची मागणीही वाढते. आयफोन घेणाऱ्या भारतीयांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. टाटा ग्रुप (Tata Group) लवकरच भारतात आयफोन बनवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. टाटा कंपनी आयफोन ठरवणारी पहिली कंपनी बनू शकते. लवकरच टाटाचा अॅपलसोबतचा करार प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता आहे. ऑगस्ट २०२३ पर्यंत शिक्कामोर्तब केले जाऊ शकते. टाटा आणि अ‍ॅपलमधला हा करार प्रत्यक्षात उतरल्यास ही मोठी घडामोड ठरणार आहे. कारण आयफोन निर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश करणारी टाटा ही पहिली स्थानिक भारतीय कंपनी ठरणार आहे. 

कर्नाटकात असलेल्या विस्ट्रॉन कॉर्प या कारखान्याचे अधिग्रहण टाटा ग्रुप करण्याच्या तयारीत असल्याचे असल्याचे समोर येत आहे. या कारखान्याची किंमत जवळपास 600 मिलियन डॉलर इतकी आहे. इथे जवळपास 10,000 हून अधिक कर्मचारी काम करतात. सध्या इथे iphone 14 या हँडसेडची निर्मिती करण्यात येत आहे. हा करार जवळपास 5 हजार कोटींचा असल्याची चर्चा आहे. मात्र, अॅपल आणि विस्ट्रॉन कॉर्पकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये.

दरम्यान, विस्ट्रोनने 2024 पर्यंत कारखान्यातून किमान $1.8 अब्ज किंमतीच्या आयफोन निर्मितीचे वचन दिले आहे. त्यासाठी पुढील वर्षापर्यंत कारखान्यातील कामगारांची संख्या तिप्पट करण्याची योजना आहे. मात्र, विस्ट्रॉन आता भारतातून आयफोन निर्मिती न करण्याच्या विचारात आहे. त्यामुळं टाटाने कारखाना खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र या प्रकरणात टाटा, विस्ट्रॉन आणि अॅपलच्या प्रवक्त्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये. 

अॅपल कंपनीचा आयफोन तसंच इतर डिव्हाइस बनवण्यासाठी भारतात तीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत. यात विस्ट्रॉन, पेगाट्रॉन आणि फॉक्सकॉन यांचा समावेश आहे. मात्र, फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप आणि पेगाट्रॉन कॉर्प या तैवानच्या कंपन्या आहेत. त्यामुळं भारतात आयफोन बनवल्यास अॅपललाच त्याचा जास्त फायदा होणार आहे. 

टाटा हा भारतातील विश्वासनीय ब्रँड आहे. मीठापासून ते तंत्रज्ञानापर्यंत टाटा वस्तू तयार करते. गेल्या 155 वर्षांपासून टाटा भारतातील तळागाळातील लोकापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळं भारतात जर आयफोनचे उत्पादन होणार असेल तर भारतीयांसाठी ही मोठी गोष्ट असेल.