First AI News Anchor: सध्या सोशल मीडियावर आर्टिफिशीएल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित कनसेप्ट बेस फोटोंची चांगलीच चलती आहे. आर्टिफिशीएल इंटेलिजन्स म्हणजेच AI चा वापर हा केवळ फोटोंसाठी केला जात नाही तर या माध्यमातून चक्क एखाद्या खऱ्याखुऱ्या माणसांप्रमाणे दिसणाऱ्या व्यक्तीही साकारता येतात. असाच एक प्रयोग भारतामधील ओडिशा राज्यातील खासगी वृत्तवाहिनीने केला आहे. या वृत्तवाहिनीने चक्क एआय बेस न्यूज अँकरच्या माध्यमातून वृत्तांकन केलं आहे.
वर फोटोत दिसणारी न्यूज अँकर ही खरीखुरी व्यक्ती नसून एएआय असल्याचं सांगितलं तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र ही अँकर इतकी हुबेहूब दिसत आहे की पहिल्यांदा तिला पाहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ती एआय जनरेटेड आहे असं वाटणार नाही. कंपनीने जारी केलेल्या माहितीनुसार ओडिशामधील हातमागावर विणलेल्या साडीच्या पेहरावात दिसत असलेली ही महिला अँकर ओटीव्ही नेटवर्कसाठी काम करणार आहे. ही एआय अँकर टीव्ही आणि ऑनलाइन माध्यमांमधून प्रेक्षकांना भेटणार आहे. ही अँकर ओडिया आणि इंग्रजी अशा 2 भाषांमध्ये बातम्या वाचून दाखवणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या एआय अँकरला नावही देण्यात आलं आहे. या अँकरला 'लिजा' (Lisa) असं नाव देण्यात आलं आहे. 'लिजा'च्या माध्यमातून ओटीव्ही ओडिया पत्रकारितेमधून पहिल्यांदाच स्थानिक भाषेत एआय न्यूज अँकरचा वापर करणार आहे. 'लिजा' अनेक भाषा बोलू शकते असंही कंपनीने म्हटलं आहे.
रविवारी (9 जुलै 2023 रोजी) पहिल्यांदा 'लिजा'ला जगासमोर आणण्यात आलं. तिचा व्हिडीओ ट्वीट करताना ओटीव्हीने, "ही आहे लिजा. ओटीव्ही आणि ओडिशामधील पहिली एआय न्यूज अँकर... ती टीव्ही ब्रॉडकास्टींग आणि पत्रकारितेमध्ये क्रांती घडवण्यासाठी सज्ज आहे," असं म्हटलं आहे. तसेच पुढे, "ओटीव्हीची एएआय न्यूज अँकर लिसामध्ये अनेक भाषा बोलण्याची क्षमता आहे. ती ओडिया भाषेत तसेच इंग्रजीमध्ये अगदी न अडखळता बातम्या देऊ शकते. ती टीव्ही आणि डिजीटल माध्यमावर तुम्हाला पहायला मिळेल," असंही कंपनीने म्हटलं आहे.
Meet Lisa, OTV and Odisha’s first AI news anchor set to revolutionize TV Broadcasting & Journalism#AIAnchorLisa #Lisa #Odisha #OTVNews #OTVAnchorLisa pic.twitter.com/NDm9ZAz8YW
— OTV (@otvnews) July 9, 2023
'लिसा'ला ओडिया भाषेमध्ये बोलण्याचं प्रशिक्षण देणं फारच कठीण काम होतं. मात्र आम्हाला हे साध्य करता आलं याचं समाधान आहे. आम्ही अजूनही या प्रकल्पावर काम करत आहोत. आम्ही तिला या क्षमतेपर्यंत प्रशिक्षित करण्याच्या विचारात आहोत की न अडखळता तिने समोरच्या व्यक्तींशी संवादही साधला पाहिजे, असं ओटीव्ही डिजीटल बिझनेसच्या प्रमुख लसिता मंगत पांडा यांनी म्हटलं आहे.