रक्तवाहिन्यांमधून प्रवास करणारा रोबो

हा रोबो थेट रक्तवाहिन्यांमधून प्रवास करु शकतो. 

Updated: Jan 25, 2019, 06:18 PM IST
रक्तवाहिन्यांमधून प्रवास करणारा रोबो title=

अमित जोशी, मुंबई : विज्ञानाचा हा नवा आविष्कार म्हणजे रक्तवाहिन्यांमधून प्रवास करणारा रोबो. रोबो म्हणजे माणसासारखाच दिसायला हवा असं नाही. तर गरजेनुसार त्याला वेगवेगळा आकार देता येतो. असाच हा मायक्रो रोबो पेशीच्या आकारापेक्षा थोडासा मोठा आहे. स्वित्झर्लंडमधल्या स्वीझ फेडरल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी आणि ईडीएच झुरीच या संस्थांनी संयुक्तरित्या संशोधन करत मायक्रो-रोबो तयार केले आहेत. या रोबोचं वैशिष्ट्य म्हणजे हा रोबो थेट रक्तवाहिन्यांमधून प्रवास करु शकतो. अर्थात रक्तवाहिन्या काही सरळ रेषेत नसतात. रक्तवाहिन्यांमधील रक्ताच्या घनतेचे प्रमाण अवयवानुसार बदलत असतं, रक्तवाहिन्यांचा आकारही वेगवेगळा असतो. तरीही हा लवचिक रोबो रक्तवाहिन्यांमधून प्रवास करु शकतो. या रोबोमुळे वैद्यकीय क्षेत्रात अनेक फायदे होणार आहेत.

शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागांत किंवा अवयवामध्ये औषध पोहोचवण्याचं काम हा रोबो करू शकतो. संबंधित औषधाचे नॅनोकण हे मायक्रो-रोबोच्या मदतीनं विशिष्ट अवयवामध्ये पोहोचवता येतील. ठराविक वेळेला औषधाची ठराविक मात्रा देणंही शक्य होणार आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी गरज असेल तेव्हाच इन्सुलिन रक्तात पोहोचवणं शक्य होईल का, यावरही संशोधन सुरू आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचवेळा एखाद्या औषधाचा किंवा इंजेक्शनचा दुष्परिणाम शरीरातल्या इतर अवयवांवर होण्याची शक्यता असते. ते रोखून फक्त विशिष्ट अवयवांपर्यंत औषध पोहोचवण्याचं काम हा रोबो करू शकेल. 

येत्या काही वर्षात यामध्ये आणखी प्रगती होईल आणि या मायक्रो रोबोचा उपयोग आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी होईल, अशी अपेक्षा आहे.