...म्हणून इथं चौथ्या मजल्यावर किंवा घरात पार्क केल्यात 2 Wheelers; फोटो झाले व्हायरल

2 Wheelers Parked In Home At Fourth Floor: सामान्यपणे दुचाकी या इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंग लॉटमध्ये पार्क केल्या जातात. मात्र सध्या समोर आलेल्या फोटोंमध्ये या दुचाकी चक्क चौथ्या मजल्यावर तसेच काही घरांमध्ये पार्क केल्याचं दिसत आहे. असं का? जाणून घ्या...

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 19, 2024, 09:42 AM IST
...म्हणून इथं चौथ्या मजल्यावर किंवा घरात पार्क केल्यात 2 Wheelers; फोटो झाले व्हायरल title=
फोटो झाले व्हायरल (फोटो - सोशल मीडियावरुन)

2 Wheelers Parked In Home At Fourth Floor:  मागील काही दिवसांपासून चेन्नईमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. सुपरस्टार रजनिकांत यांच्या बंगल्यातही पाणी साचलं आहे. कमी वेळात भरपूर पाऊस पडल्याने शहरातील अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. मात्र पावसाचा अंदाज असल्याने येथील स्थानिकांनी आपल्या दुचाकी पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी फारच अजब निर्णय घेतला आहे. चेन्नईमधील पूरपरिस्थितीमधून आपल्या दुचाकी सुरक्षित ठेवण्यासाठी चक्क त्या काही मजले वर चढवून पॅसेजमध्ये पार्क केल्या आहेत. त्यामुळे चौथ्या किंवा तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट्सदरम्यान असलेल्या पॅसेजमध्ये चक्क दुचकी उभ्या असल्याचं चित्र अनेक इमारतीमध्ये पाहायला मिळत आहे.

नेमका कुठे घडला हा प्रकार?

वेलाचेरी येथे राहणाऱ्या कविता विष्णू वर्धिनी यांनी त्यांच्या इमारतीमधील एक फोटो आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन शेअऱ केला. इमारतीमधील कॉरिडोअरमध्ये चौथ्या मजल्यावर अनेक दुचाकी पार्क केल्याचं दिसत आहे. दुचाकींबरोबरच सायकलही या ठिकाणी उभ्या करण्यात आल्याचं दिसतंय. वेलाचेरी हा परिसर चेन्नईमध्ये पावसाचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागांपैकी एक आहे. दर पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचतं. त्यामुळेच शहरभर पाऊस पडत असतानाच आपल्या इथेही लवकरच पाणी साचणार असा अंदाज बांधून नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने थेट चौथ्या मजल्यावर आपल्या दुचाकी पार्क केल्या. या नागरिकांचा अंदाज बरोबर ठरला. 

काय म्हटलंय पोस्टमध्ये?

"वेलाचेरी येथील आमच्या इमारतीमधील कॉरिडोअरमधला हा फोटो बघा, विशेष बाब म्हणजे आम्ही चौथ्या मजल्यावर राहतो," अशी कॅप्शन कविता यांनी कॉरिडोअरमध्ये उभ्या केलेल्या दुचाकींचा फोटो शेअर करत म्हटलं आहे.

कविता यांनी मागील वर्षी पडलेल्या पावसामध्ये इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये भरपूर पाणी साचलं होतं. त्यामुळे अनेक वाहनांचं नुकसान झालेलं, असं नमूद केलं आहे. त्यामुळेच लोकांनी यंदा अधिक काळजी घेत पाणी साचून नुकसान होण्याची वाट न पाहता आधीपासूनच दुचाकी इमारतीच्या वरच्या मजल्यांवरील पॅसेजमध्ये पार्क केल्या.

आम्ही तर घरात पार्क केल्यात दुचाकी

कविता यांच्या या पोस्टला रिप्लाय करताना अन्य एका व्यक्तीने त्यांच्या इथेही अशीच स्थिती असून तीन दुचाकी चक्क घरात पार्क केल्या असल्याचा फोटो शेअर केला. 

जोरदार पाऊस

वेलाचेरीबरोबरच चेन्नईमधील कोयंबेडू, गिंडी, मदिपक्कम येथेही जोरदार पाऊस झाला. रविवारपासून पुढील काही दिवस येथे जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. मात्र आता या पावसाचा जोर कमी झाला आहे.