नवी दिल्ली : तुम्ही एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
प्रसिद्ध कार निर्माता कंपनी असलेल्या रेनोने आपल्या डस्टर गाडीच्या किमतीत मोठी कपात केली आहे. पाहूयात किती रुपयांनी स्वस्त झालीय रेनोची डस्टर...
कंपनीने पेट्रोल व्हेरिएंटच्या किमतीत ३६ हजार रुपयांपासून ५६ हजार रुपयांपर्यंत कपात केली आहे. तर, डिझेल व्हेरिएंटच्या किमतीत ५० हजार रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंत कपात केली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रेनो डस्टर गाडीचं उत्पादन नव्या स्तरावर सुरु करण्यात आलं आहे. गाडीच्या किमतीत करण्यात आलेल्या कपातीचा थेट फायदा ग्राहकांना मिळणार आहे.
रेनो डस्टरच्या पेट्रोल रेंजची सुरुवाती किंमत ७.९५ लाख रुपये (एक्स शोरुम) ठेवण्यात आली आहे. तर, डिझेल व्हेरिएंटची सुरुवाती किंमत ८.९५ लाख रुपये (एक्स शोरुम) ठेवण्यात आली आहे.
सर्वाधिक कपात रेनो डस्टरच्या RXZ ११० PS AWD या गाडीच्या किंमतीत करण्यात आली आहे. या कारच्या किमतीत एक लाख रुपयांनी कपात केली आहे.
रेनो कारच्या विक्रीत घट झाल्याचं पहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डस्टरच्या विक्रीत १८ टक्क्यांनी घट झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच कंपनीने किमतीत घट करण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.