मानसिक तणाव असणाऱ्यांकडून फेसबूकचा जास्त वापर

सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या फेसबूकचा उद्देश खरं तर जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या माणसाला जवळ आणणं हा आहे.

Updated: May 31, 2019, 10:02 PM IST
मानसिक तणाव असणाऱ्यांकडून फेसबूकचा जास्त वापर title=

सुष्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या फेसबूकचा उद्देश खरं तर जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या माणसाला जवळ आणणं हा आहे. पण अनेकांसाठी हेच फेसबूक व्यसन बनलं आहे. मनोरंजनाऐवजी फेसबूकमुळे अनेकजण तणावात जात आहेत. रिसर्चवर नजर टाकली तर हे बघायला मिळतं. 

जी माणसे नेहमी तणावात असतात त्यांना फेसबुक, इन्स्टाग्रामवर किंवा सोशल मीडिया साइट्सवर वेळ घालवण्याची सवय लागते. सध्या स्मार्ट फोनमुळे एका क्लिकवर अपडेट मिळतात आणि फेसबुक गुगल इन्स्टाग्रामवर माहितीसह मनोरंजन होते, त्यामुळे विविध वयोगटातील लोक ह्याचे युजर्स आहेत.

या रिसर्चसाठी अभ्यासकांनी ऑनलाइन सर्व्हेच्या निष्कर्षांचं विश्लेषण केलं. ज्यात १८ ते ५६ वयोगटातील ३०९ फेसबुक यूजर्सना सहभागी करून घेण्यात आलं होतं. या रिसर्चचे निष्कर्ष सायकियाट्री रिसर्च नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेत.

अभ्यासकांनी या रिसर्चमध्ये सहभागी लोकांना प्रश्न विचारला की, सोशल नेटवर्किंग साइट्स त्यांचा स्ट्रेस लेव्हल कमी करण्यात किती मदत करतात आणि तसेच त्यांना स्ट्रेस असताना ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्हीकडे किती सपोर्ट मिळतो. सोबतच यूजर्सना असेही विचारण्यात आले की, ते दररोज फेसबूकवर किती वेळ घालवतात? आणि जेव्हा ते ऑनलाइन नसतात तेव्हा त्यांना कसं वाटतं?.

स्ट्रेसचा स्तर जेवढा जास्त होता, ती व्यक्ती तेवढा जास्त वेळ फेसबूकवर घालवत होती. रोजच्या स्ट्रेसची गंभीरता आणि फेसबूक इंगेजमेंटमध्ये सकारात्मक नातं आहे. ज्यामुळे हे म्हटलं जाऊ शकतं की, स्ट्रेसमुळे सोशल नेटवर्किंग साइट्सची सवय लागते. त्यावर अनेकदा अवलंबून रहावं लागतं. पण जर तणावाचा सामना करायचा असेल आणि व्यक्तीला परिवार आणि मित्रांची मदत मिळत असेल तर ही सवय कमी केली जाऊ शकते.