Vehicle Demand: कोरोनानंतर आता ऑटोक्षेत्र पुन्हा एकदा ट्रॅकवर येऊ लागलं आहे. वाहन उत्पादकांसाटी नोव्हेंबर महिना सर्वाधिक विक्रीचा ठरला. वाहन विक्रीत गेल्या महिन्यात चांगलीच वाढ झाली आहे. फेडरेशन ऑफ व्हेईकल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबर महिन्यात वाहनांच्या किरकोळ विक्रीत मोठी उसळी दिसून आली. प्रवासी वाहने, दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या नोंदणीत वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात वाहनांची एकूण किरकोळ विक्री 23,80,465 युनिट इतकी झाली. नोव्हेंबर 2021 मध्ये गाड्यांची विक्री 18,93,647 युनिट्स होती. म्हणजेच नोव्हेंबर 2022 मध्ये वाहनांच्या किरकोळ विक्रीत वार्षिक 26 टक्के वाढ झाली आहे. FADA चे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया म्हणाले, "नोव्हेंबर 2022 हा भारतीय वाहन उद्योगाच्या इतिहासातील सर्वाधिक किरकोळ विक्रीचा महिना ठरला आहे."
FADA च्या मते, गेल्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर 2022 मध्ये, प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री 21 टक्क्यांनी वाढली (वार्षिक आधारावर) आणि तीन लाख युनिट्सचा टप्पा पार केला. मॉडेल्सची चांगली उपलब्धता, बाजारात नवीन वाहनांची एंट्री आणि ग्रामीण भागातून वाढती मागणी हे याचे कारण आहे. दुसरीकडे, सणासुदीचा हंगाम संपून लग्नसराई सुरू झाल्याने विक्रीत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
बातमी वाचा- Car Loan: कार लोन घेताना 20-10-4 चं सूत्र लक्षात ठेवा! कर्ज लवकर फिटेल
गेल्या महिन्यात प्रवासी वाहनांची एकूण किरकोळ विक्री 3,00,922 युनिट्स इतकी आहे. मागच्या वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये 2,48,052 युनिट्स होती. त्याचप्रमाणे गेल्या महिन्यात दुचाकींच्या नोंदणीत 24 टक्क्यांनी वाढ होऊन ती 18,47,708 युनिट्सवर पोहोचली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये हा आकडा 14,94,797 युनिट्स इतका होता. याशिवाय नोव्हेंबरमध्ये व्यावसायिक वाहनांच्या किरकोळ विक्रीतही वाढ झाली आहे.
बातमी वाचा- TATA इलेक्ट्रिक Nano आणण्याच्या तयारीत, काय असेल खासियत जाणून घ्या
नोव्हेंबर 2022 मध्ये, व्यावसायिक वाहनांच्या किरकोळ विक्रीत 33 टक्के वाढ झाली असून 79,369 युनिट्सवर पोहोचली. मागच्या वर्षी 2021 मध्ये 59,765 युनिट इतकी होती. नोव्हेंबर 2022 मध्ये, तीन चाकी आणि ट्रॅक्टरच्या विक्रीत अनुक्रमे 81 टक्के आणि 57 टक्के वाढ झाली आहे.