नवी दिल्ली : भारतात आणि जगभरात अतिशय लोकप्रिय असणाऱ्या जिप्सी या राकट कारचं उत्सादन थांबवण्याचा महत्त्वाचा निर्णय मारुती सुझुकीकडून घेण्यात आला आहे. अतिशय मजबूत इंजिन असणाऱ्या या 4x4 ड्राईव्ह असणाऱ्या गाडीचं उत्पादन थांबवल्यामुळे कार प्रेमींमध्ये आणि विशेषत: रोड ट्रीपला निघणाऱ्या मंडळींमध्ये मनाराजी पाहायला मिळत आहे. मारुती सुझुकीच्या मारूती ८०० आणि ओमनी या गाड्यांच्या नंतर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या जिप्सीचं वय हे सध्याच्या घडीला ३३ वर्षे इतकं होतं.
१९८५ मध्ये या गाडीच्या उत्पादनाला सुरुवात झाली होती. पण, यापुढे मात्र तिचं उत्रादन थांबवण्यात आल्याचं मारुती सुझुकीकडून अधिकृतपणे सांगण्यात आलं आहे. इतकच नव्हे तर, एसयुव्ही डीलर्सनी यापुढे जिप्सीच्या कोणत्याही बुकींग घेऊ नयेत असे निर्देशही त्यांना देण्यात आले आहेत.
सुरक्षेच्या निकषांमुळे या गाडीचं उत्पादन थांबवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. सुरक्षेच्या बाबतीतील सक्तीचे काही निकष हे एप्रिल महिन्याच सर्वांसमोर येणार आहेत. पण, मारुतीने मात्र जिप्सीच्या एकंदर बांधणीतही काही बदल न केल्यामुळे ती अपघात चाचणीत उत्तीर्ण होऊ शकली नाही ज्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं कळत असल्याची माहिची सूत्रांनी दिली.
बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्यापासूनच १.० लीटर फोर सिलिंडक आणि फोर स्पीड ट्रांसमिशन असणारी कार्यप्रणाली जिप्सीमध्ये होती. ही गाडी तिच्या अनोख्या आणि दमदार लूकसाठी जास्त प्रसिद्ध होती. पुढे जाऊन ती १.३ लीटर इंजिन व्हेरियंट आणि फाईव्ह स्पीड मॅन्यूअल गिअर बॉक्ससह अपग्रेडही झाली होती. भारतीय सैन्यदलातील काही तुकड्यांमध्येगही तिचा सर्रास वापर आहे. त्यांच्याकडून २०१५ मध्ये जिप्सीसाठीची शेवटी मागणी होती. फक्त भारतातच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय बाजारातही ही गाडी अनेकांच्याच फेव्हरेट लिस्टचा भाग होती. आंतरराष्ट्रीय बाजारात ती सामुराय किंवा SJ410 या नावाने ओळखली जाते. यापुढे अनेकांच्याच आवडीची ही दणकट गाडी विकत घेता येणार नसली तरीही, सैन्यदल, विविध राज्यांचे पोलीस दल आणि इतर काही जणांच्या ती वापरात असल्यामुळे तिचा वावर पाहायला मिळेल. अर्थात हा वावर विरळ झाला असेल हेसुद्धा तितकच खरं. असं असलं तरीही जिप्सी कारवेड्या मंडळींच्या फेव्हरेट लिस्टमध्ये अग्रस्थानी होती, आहे आणि यापुढेही राहील असं म्हणणं वावगं ठरणार नाही.