नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीनं (Maruti Suzuki) काही दिवसांपूर्वी लॉन्च केलेल्या हॅचबॅक 'वॅगन - आर'चं सीएनजी वेरिएन्ट लॉन्च केलंय. आता या गाडीचं सीएनजी व्हेरिएन्ट लॉन्च करण्यात आलंय. सीएनजी मॉडेलला एलएक्सआय आणि एलएक्सआय ओ वेरिएन्टमध्ये सादर करण्यात आलंय. १.० लीटर इंजिन असलेल्या 'वॅगन आर'मध्ये कंपनी फिटेड सीएनजी किट देण्यात आलंय.
'मारुती'च्या दाव्यानुसार, सीएनजी वॅगन आर ३३.५४ किमी प्रती किलोग्रॅमचं मायलेज देते. मारुतीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (सेल्स एन्ड मार्केटिंग) आर एल कलसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी वॅगन आर एस-सीएनजी ग्राहक जुन्या सीएनजी वॅगन आरच्या तुलनेत २६ टक्के जास्त इंधन बचत करू शकतील. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. सोबतच ही पर्यावरणासाठी अनुकूलही आहे.
सीएनजी फिटेड १.० लीटर इंजिन ५५०० आरपीएमवर ५८ बीएचपी पॉवर आणि ३५०० आरपीएमवर ७८ एनएम टॉर्क जनरेट करतं. ही गाडी ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत उपलब्ध आहे.
एलएक्सआय आणि एलएक्सआय ओ या दोन्ही नवे वेरिएन्ट दिल्ली-एनसीआर, गुजरात, मुंबई, पुणे तसंच आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्येही उपलब्ध होतील. 'वॅगन आर' सीएनजी व्हेरिएन्ट दिल्लीत ४.८४ लाख रुपये आणि ४.८९ लाख रुपयांना उपलब्ध आहे.