भारतात कोणी खरेदी केलेली पहिली कार? त्या व्यक्तीचं नाव माहितीये? वाचा थक्क करणारा इतिहास

Indian Auto Sector History : भारतीय ऑटो क्षेत्रातील महत्त्वाचे टप्पे माहितीयेत? इतिहासात डोकावून पाहताना भारावून जाल...   

सायली पाटील | Updated: Dec 31, 2024, 03:07 PM IST
भारतात कोणी खरेदी केलेली पहिली कार? त्या व्यक्तीचं नाव माहितीये? वाचा थक्क करणारा इतिहास title=
First indian person who own car in india history of indian automobile industry car brand and model

Indian Auto Sector History : भारतीय ऑटो क्षेत्राचा इतिहास फार जुना असून, या क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावरील क्रमवारीचा आढावा घ्यायचा झाल्यास भारताचा तिसरा क्रमांक येतो. जगभरातील कैक ऑटो कंपन्या भारतीय बाजारपेठेत आपली मोहोर उमटवण्यासाठी प्रयत्नशील असून, यामध्ये भारतीय कंपन्य़ासुद्धा मागे नाहीत. 

महत्त्वाची बाब म्हणजे रंजक इतिहास असणाऱ्या या देशात सर्वात पहिलीवहिली कार कोणी खरेदी केली, हासुद्धा एक कमाल प्रश्न. विविध ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या संदर्भांनुसार भारतात सर्वात पहिली कार 1897 मध्ये आली. क्रॉम्पटन ग्रीव्जशी संलग्न फॉस्टर नावाच्या ब्रिटीश व्यक्तीनं ही कार आणली होती. दरम्यानच्या काळात कलकत्ता शहरात ब्रिटीशराज असल्या कारणानं देशातील पहिली कारही इथंच आणली गेली होती. 

काही संदर्भांनुसार 1892 मध्ये पटियाला संस्थानचे महाराजा राजिंदर सिंग यांनी De Dion Bouton ही फ्रेंच बनावटीची कार खरेदी केली असून, ती फ्रान्सवरून मागवण्यात आली होती. असंही म्हटलं जातं की 1898 मध्ये मुंबईत 4 कारची विक्री झाली होती. या कारच्या खरेदीदारांमधील एक व्यक्ती होते टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी टाटा. 

फादर ऑफ ट्रान्सपोर्टेशन... 

भारतात वालचंद हिराचंद जोशी यांना 'फादर ऑफ ट्रान्सपोर्टेशन' म्हणून ओळखलं जातं. 1945 मध्ये त्यांनी भारतात प्रिमीयर ऑटोमोबाईल्स या पहिल्या कार कंपनीची सुरुवात करत 1949 मध्ये पहिली कार बाजारात आणली होती. याचदरम्यान बिर्ला कुटुंबानं 1948 मध्ये हिंदुस्तान मोटर्सअंतर्गत गुजरातमध्ये एमजी 10 वर आधारित कार असेम्बली सुरू केली. 1957 मध्ये ती अॅम्बेसेडर म्हणून लाँच करण्यात आली.

हेसुद्धा वाचा : तब्बल ₹17000 कोटींची गडगंज श्रीमंती असतानाही कैक वर्ष जुन्या घरातच का राहतात आनंद महिंद्रा? 

भारत सरकारनं 24 फेब्रुवारी 1981 मध्ये मारुती उद्योग प्रायव्हेट लिमिटेड या नावानं नवी कार कंपनी सुरू केली. 1983 मध्ये याच कंपनीनं मारुती 800 ही कार लाँच केली. दिल्लीतील हरपाल सिंह यांनी देशातील पहिलीवहिली मारुती 800 कार खरेदी केली होती. 1983 मध्ये तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वत: या कारच्या किल्ल्या त्यांना दिल्या होत्या. 

आता या क्षेत्रात भारत वेगळी ओळख प्रस्थापित करू लागला होता. 30 डिसेंबर 1998 मध्ये रतन टाटा यांनी देशातील पहिली इंडिजिनिअस कार लाँच केली. या कारचं नाव होतं, TATA Indica आणि या कारची किंमत होती 2 लाख 60 हजार रुपये. 17 जानेवारी 2008 मध्ये टाटांनीच त्या वेळची देशातील सर्वात स्वस्त अशी नॅनो कार लाँच करत सामान्यांच्या दारापर्यंत कार पोहोचवली. पहिल्या नॅनो कारची डिलीव्हरी मुंबईत सुरू झाली आणि या कारचे मालक होचे रघुनाथ विचारे. खुद्द रतन टाटा यांनी त्यांना या कारची चावी दिली होती.

भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये आजच्या घडीला कैक ब्रँड आणि कैक मॉडेल उपलब्ध असून दिवसेंदिवस या क्षेत्राची प्रगतीपथावर वाटचाल सुरूच आहे.