Electric Scooter Price Hike From 1st June: देशात सध्या साधारण दर तिसऱ्या व्यक्तीकडे दुचाकी आहे. प्रवास सुखकर होण्यासाठी, अपेक्षित ठिकाणी वाहतूक कोंडीतून तुलनेनं वेळेत पोहोचण्यासाठी या दुचाकींचा मोठ्या प्रमाणत वापर केला जातो. पण, आता हीच दुचाकी खरेदी करण्याचा विचार तुम्ही केला असेल, तर यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण ठरतोय तो म्हणजे केंद्र शासनानं घेतलेला एक निर्णय.
केंद्र शासनानं (Electric two wheeler) इलेक्ट्रीक वाहनांवर दिल्या जाणाऱ्या अनुदानात घट केली असून, आता ते 15000 रुपयांऐवजी 10 हजार रुपये इतकं करण्यात आलं आहे. प्रती किलोवॅटमागे हे दर बदलले असून, आता त्याचा परिणाम दुचाकींच्या किमतीवर होणार आहे. किंबहुना या दुचाकींची किंमत तब्बल 25 ते 35 हजारांनी वाढणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांवर देण्यात येणाऱ्या अनुदानात कपात केल्यामुळं या दुचाकी तयार करणाऱ्या कंपन्या दुचाकींचे फिचर्स आणि त्यांच्या बॅटरी पॅकमध्ये कपात करण्याचा निर्णय घेऊ शकतात. फेम स्कीम II अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांवर मिळणाऱ्या अनुदानात कपात झाल्यामुळे एथर 450 एक्सच्या दरांत तब्बल 32500 रुपयांनी वाढ झाली आहे.
फक्त एथरत नव्हे, तर आघाडीच्या इलेक्ट्रीक वाहन निर्मात्या OLA या कंपनीकडूनही स्कूटरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळं इथून पुढे या दुचाकीची किंमत लाखोंच्या घरात असेल. सध्या ओलाच्या दुचाकींमध्ये 15 हजारांनी वाढ झाल्यामुळं ओला एस1 ची नवी किंमत 1,29,999 रुपये, ओला एस1 एयर ची किंमत 99,999 रुपये आणि ओला एस1 प्रो ची किंमत 1,39,000 रुपये (एक्स शोरुम) इतकी असेल.
इलेक्ट्रीक दुचाकीच्या क्षेत्रात गुजरातच्या स्टार्टअप असणाऱ्या मॅटर एनर्जी या कंपनीनंही त्यांच्या एरा या दुचाकीच्या दरात 30 हजार रुपयांनी वाढ केली आहे. ज्यामुळं आता या दुचाकीचे दर 1.74 आणि 1.84 लाखांच्या घरात पोहोचले आहेत.
दरम्यान, एप्रिल 2023 मध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची सर्वाधिक विक्री झाल्याची माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन (फाडा) कडून देण्यात आली होती. एकिकडे EV ला पसंती मिळत असतानाच दुसरीकडे त्यावरील अनुदानात कपात करण्यात आल्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत.